...आता दिव्यात अर्धे पाणी घालत नाही!

गुरुनाथ साने, कराड
बुधवार, 31 ऑगस्ट 2016

अरेऽऽ, आमच्या वेळचा गणेशोत्सव म्हणजे..!

सध्या रस्त्यांवरून संध्याकाळी चक्कर मारली, की गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू झाल्याचा एक मस्त ‘फील‘ येतो.. गणपतीच्या मूर्तींचे स्टॉल, मखरं आणि इतर सजावटीचं साहित्य वगैरे पाहिल्यानंतर प्रत्यक्ष गणपती घरी यायच्या आधीच आपण गणेशोत्सवाच्या ‘मूड‘मध्ये जातो.. मग घरीही कधी गप्पा रंगतात आणि बाबा सांगतात, ‘अरे, आमच्या वेळी इतकी मजा यायची ना गणपतीमध्ये..! आम्ही यांव करायचो, त्यांव करायचो..‘ गणपतीच्या आठवणी प्रत्येकाकडे आहेत.. प्रत्येकाच्या घरचा गणपती वेगळा, त्याच्या आठवणी वेगळ्या आणि त्या आठवणी पुन्हा पुन्हा जागवण्याचा आनंदही वेगळाच..! 

तुमच्याकडेही आहेत गणेशोत्सवाच्या आठवणी..? मग व्यक्त व्हा ‘ई-सकाळ डॉट कॉम‘वर.. लिहून काढा आठवणी आणि त्याच्यासोबत एखादा छानसा फोटो असा ई-मेल पाठवा आम्हाला webeditor@esakal.com या ई-मेल आयडीवर..! 

लेख पाठवताना... 

  • तुमचे संपूर्ण नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक नमूद करा.
  • सब्जेक्‍टमध्ये ‘आमचा गणपती‘ असं नमूद करा..

आमचा गणपती तसा साधाच असायचा. बाबा बाहेरगावी असल्यामुळे गणपती आणण्याचं काम पहिल्यापासून मलाच करावं लागायचं. मी गणपती आणणार म्हटल्यावर आई छोटीशीच मूर्ती ठरवायची; पण माझा आग्रह मोठी मूर्ती घ्यायचा असायाच. मग मध्यम आकाराच्या मूर्तीवर सुवर्णमध्य निघायचा. मूर्ती निश्‍चित झाल्यावर सजावटीची मोहीम सुरू होत असे. नुसता विचार करण्यातच आठ-आठ दिवस जायचे. मग एखादी कल्पना पसंत पडायची. पण पैसे, मूर्तीची उंची आणि घरातली जागा यामुळे बऱ्याच वेळा कल्पना रद्द करावी लागायची. मग नेहमीचा कापसाचा हिमालय गणपतीसाठी सज्ज करायला घेत असू.. 

इथे गणपती आदल्या दिवशी आणतात. त्यामुळे हिमालय पूर्ण होण्याच्या आधीच गणपती घरी पोचायचे. मग एका रात्रीत हिमालय पर्वताच्या जागी हिमालय डोंगर करायचो आणि दुसऱ्या दिवशी पुस्तकात वाचून गणपतीची प्राणप्रतिष्ठापना व्हायची. हिमालयाचा प्लॅन फ्लॉप गेल्यानंतर ‘जिवंत नाटका‘चा प्रयत्न व्हायचा. पण ‘अभ्यास‘ किंवा ‘पाहुणे येणार‘ या नावाखाली आयत्या वेळी सर्व मित्रमंडळी ‘मिस्टर इंडिया‘ व्हायची. मग माझे दिवाळीतले किल्ल्यावरचे सैनिक मदतीला यायचे. त्यांच्या मदतीने मग मी इतिहासातील काही प्रसंग बडबडत बसायचो. त्यात शिवाजी महाराज कुणाला तरी फाशी किंवा तोफेच्या तोंडी द्यायचे, कुणाला तरी जहागिरी मिळायची, कधी कधी शिवरायांचा राज्याभिषेक व्हायचा.. (तुटलेले) 10-20 सैनिक अफजल खानाचे आणि (धडधाकट, मोठे आणि सुंदर) पाच-सहा सैनिक शिवाजी महाराजांच्या बाजूने लढायचे.. घरी आलेल्या पाहुण्यांना हे सगळं दाखवायचा माझा अट्टाहास असायचा.. त्यात अनेकदा ते ‘बोअर‘ व्हायचे, हे नंतर कळलं.. 

संध्याकाळी आई आरत्या आणि स्तोत्रे शिकवायची. इथेही आरतीचं ताट माझ्याकडेच असल्यामुळे तिचं अर्धं लक्ष आरतीमध्ये, तर अर्धं लक्ष ताटाकडे असायचं. कधी कधी एखादा पाहुणा माझा ताटावरचा हक्क घ्यायचा. मग त्याने कितीही बक्षीस दिलं, तरीही ‘चंद्रकांता‘मधला व्हिलन ‘यक्कू‘ असल्यासारखाच वाटायचा. रात्री आई आम्हाला जवळच्या मंडळात देखावे पाहायला घेऊन जात असे. मग दुसऱ्या दिवशी त्याची चर्चा शाळेत रंगायची.. आपल्या जवळच्या गणपतीचे देखावे कितीही सुंदर असले, तरीही ‘लांबच्या मंडळात खूप छान देखावे आहेत‘ असं वाटायचं. 

गणपती विसर्जनाच्या दोन-तीन दिवस आधी माझे बाबा घरी यायचे. मग लांबचे देखावे पाहण्याचा हट्ट त्यांच्याकडे करत असू. देखावे पाहताना ‘पुढच्या वर्षी आपल्याला हे घरी करणं जमेल का‘ हाच विचार सुरू असायचा. देखावे पाहून झाले, की कुठेतरी भेळ, पावभाजी खाऊन घरी परतायचो. येताना रस्त्यात बाबांचं डोकं खायचो.. ही मंडळं लाईटच्या एवढ्या माळा कशा काय लावतात, याचं अप्रूप वाटायचं. आमच्याकडे लाईटची एकच माळ होती. तीच आम्ही गणपती-दिवाळीला लावायचो.. 

थोडा मोठा झाल्यानंतर हिमालयाची जागा लाईटच्या माळा, फिरत्या चक्राने घेतली आणि माझ्या सैनिकांच्या बडबडीची जागा टेपरेकॉर्डरने.. गणपतीच्या आधी मी ‘होलसेल‘मध्ये माळा घेऊन त्या गल्लीत विकत असे. नफ्यामध्ये मला एक माळ जरी मिळाली, तरीही आकाश ठेंगणं वाटायचं. दिवस जातील, तसे थर्माकोलची मखरं विकायला लागलो. पण स्वत:च्या गणपतीला मात्र स्वत: केलेलं मखर असायचं, मग ते कसेही असो.. त्यात फिरता पंखा लावत असे. बऱ्याच वेळा एक-दोन दिवसांत त्याचा सेल जायचा. पण सोवळ्या-ओवळ्यामुळे सेल बदलता यायचा नाही. दरम्यान, लेझीम पथकामध्येही मी सहभागी झालो होतो. 

आणखी थोडा मोठा झाल्यावर पर्यावरण, प्रदूषण वगैरे गोष्टी कळायला लागल्या. मग माझाच मोठ्या मूर्तीचा हट्ट संपून छोटीशीच शाडूची मूर्ती आणायला लागलो. लेझीम पथकातून बाहेर पडलो होतो. ‘डीजे‘ वगैरे पद्धत नवीन असल्याने ते आवडत होतं; पण एक-दोन वर्षांतच तेही भयानक वाटायला लागलं. थर्माकोलची मखरंही आता नकोशी वाटायला लागली होती. फुलांची आरास खर्चिक होती आणि पाच-सहा दिवस ती टिकायचीही नाही. मग खूप विचार करून ठरलं, की फक्त दिव्यांची आरास करायची. दिवाळीमधल्या सैनिकांना आधीच रजा मिळाली होती. आता पणत्या बाहेर आल्या. त्यातही अर्धे पाणी-अर्धे तेल घालून दिवा पेटवायचो. लोकांना आणि घरच्या मंडळींनाही ‘ही दिवाळी आहे की गणपती‘ असा प्रश्‍न पडायचा. आणखी मोठा झाल्यावर कळलं, की मूर्तीचे रंगही विसर्जन केल्यावर पाणी प्रदुषित करतात. मग मूर्ती दान करायचा प्रस्ताव घरी मांडला. अपेक्षेप्रमाणे विरोध झाला आणि घरात खरोखरीच रामायण झाले. तो विषय बारगळला; पण त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे बादलीत विसर्जन करता येईल, अशी लहान मूर्ती घ्यायला आई-बाबा तयार झाले. पण शेवटी त्याचं विसर्जनही नदीतच झाले. पण मूर्तीदानाची कल्पना मंडळात पटवून दिली आणि मंडळाने हा बदल स्वीकारला. 

असा आमचा गणपती हळूहळू प्रगत होत गेला; पण उत्साह कमी झाला नाही. आता नोकरीमुळे वेळ जरा कमीच पडतो; पण तरीही दिव्याची आरास होतेच. स्वत: कमवायला लागल्यानंतर अनेक शोभिवंत दिवे घेतले आहेत.. दरवर्षी घेतो.. जुनेही वापरतो आणि आता दिव्यात अर्धे पाणी घालायचे कष्ट घेत नाही.. भविष्यात धातूची कायमस्वरूपी मूर्ती घेऊन दरवर्षी पूजेसाठी मातीची छोटी मूर्ती स्वत: करायचा विचार आहे.. पाहू, बाप्पांच्या मनात काय आहे..!