सरकारी रुग्णालयात सेवा उत्तम मिळावी - डॉ. हिंमतराव बावस्कर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

पुणे - खासगी रुग्णालयांच्या तुलनेत सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा गरजूंना परवडणाऱ्या आहेत. पण, येथील अवस्था अतिशय बिकट आहे. सरकारी रुग्णालये हा देशाचा प्राणवायू असून, येथील वैद्यकीय सेवा गुणवत्तापूर्ण झाल्या पाहिजेत. निःस्वार्थी भावनेने मिळणाऱ्या सरकारी रुग्णालयातील सेवेवर लोकांचा हक्क आहे, असे मत आरोग्य संशोधक डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी सोमवारी व्यक्त केले.

‘नातू फाउंडेशन’तर्फे दिला जाणारा ‘महादेव बळवंत नातू स्मृती पुरस्कार’ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांना डॉ. बावस्कर यांच्या हस्ते दिला, तर ‘सुलोचना नातू सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्कार’ चंद्रपूर येथील ‘डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे डॉ. सुरेश डंबोळे यांना देण्यात आला. फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त दत्तात्रेय टोळ उपस्थित होते. विविध सामाजिक संस्थांना फाउंडेशनकडून देणग्या देण्यात आल्या. शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे आणि गौरी शिकारपूर यांचा सत्कार केला. 

डॉ. केळकर म्हणाले, ‘‘आज डॉक्‍टर हे देश आणि संस्थांपेक्षा वैयक्तिक प्रगतीवर अधिक भर देतात. देशाचा विचार कोणीच करत नाही. वैद्यकीय सेवा बजावताना सर्वप्रथम देशाचा, त्यानंतर संस्थांचा आणि मग वैयक्तिक आयुष्याचा विचार केला पाहिजे. देशासाठी काम करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. त्यासाठी झोकून द्यावे. तसेच, संस्था-संघटनांनी एकत्र येऊन काम करावे.’’

डॉ. डंबोळे म्हणाले, ‘‘गडचिरोलीसारख्या दुर्गम ठिकाणी वैद्यकीय सुविधा पोचविण्याचा प्रयत्न केला. येथील लोक डॉक्‍टरांपेक्षा गावातील पुजाऱ्यांवर जास्त विश्वास ठेवायचे. हे चित्र बदलण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला; पण जागृतीमुळे येथील लोक तपासणीसाठी येत आहेत. तसेच, २२ गावांमध्ये मी आरोग्य रक्षक तयार केले आहेत.’’