रक्तदानासाठी भेटवस्तूंचे आमिष

योगिराज प्रभुणे - @yogirajprabhune
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

पुणे - वेगवेगळी आमिषे दाखवून रक्तदात्यांना रक्तदान शिबिरांकडे आकर्षित करण्याच्या क्‍लृप्त्यांना शहरात उधाण आले आहे. अामिषापोटी रक्तदान करु नये, असा कायदा असूनही याबाबतचे मोठे फलक शहरात लागतात. यावर नियंत्रण ठेवण्यात ‘अन्न व औषध प्रशासन’ची (एफडीए) यंत्रणा अपयशी ठरल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पुणे - वेगवेगळी आमिषे दाखवून रक्तदात्यांना रक्तदान शिबिरांकडे आकर्षित करण्याच्या क्‍लृप्त्यांना शहरात उधाण आले आहे. अामिषापोटी रक्तदान करु नये, असा कायदा असूनही याबाबतचे मोठे फलक शहरात लागतात. यावर नियंत्रण ठेवण्यात ‘अन्न व औषध प्रशासन’ची (एफडीए) यंत्रणा अपयशी ठरल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

प्रत्येक रुग्णाला सुरक्षित रक्त मिळण्यासाठी ऐच्छिक रक्तदानाचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे रक्तपेढीत संकलित होणाऱ्या रक्ताची प्रत्येक पिशवी ही स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्‍तदात्याची असावी, अशी अपेक्षा  औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा परिशिष्ट  ‘एफ’मध्ये व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात शहरात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदात्यांना पेन ड्राइव्हसारख्या वस्तू देण्यात येणार असल्याची ठळकपणे जाहिरात करण्यात आल्याचे चित्र दिसले.

रक्तदात्यांना भेटवस्तू नकोत
रक्तदान हे पवित्र दान आहे. त्यामुळे रक्तदात्याने कोणत्यातरी आमिषापोटी रक्तदान करू नये, अशी अपेक्षा कायद्याने व्यक्त केली आहे. रुग्णाला सुरक्षित रक्त मिळणे, हे महत्त्वाचे आहे. भेटवस्तूच्या आकर्षणातून कोणीही रक्तदानासाठी शिबिरात येण्याचा धोका असतो. त्या रक्तदात्यांच्या सवयी माहीत नसतात. त्यातून अशुद्ध रक्त संकलित होण्याची शक्‍यता असते. ‘विंडो पिरियड’मधील रोगजंतूंचे निदान होत नाही. त्यामुळे रुग्णाला असुरक्षित रक्तपुरवठ्याची भीती असते. 

ऐच्छिक रक्तदानाचा आग्रह
रक्तदान ऐच्छिक असावे, असा आग्रह ‘नॅशनल एड्‌स कंट्रोल ऑर्गनायझेशन’ने (नॅको) धरला आहे. त्यामुळे रक्तदानाबाबत जागृत असलेले आणि त्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणारे रक्तदाते रक्तदानासाठी पुढे येतील. त्यातून संकलित होणारे रक्त अधिक सुरक्षित असेल. त्यासाठी ऐच्छिक रक्तदानाचा प्रसार आणि प्रचार केला जात आहे.

अत्याधुनिक सुविधा
रक्तदान शिबिरांमधून संकलित केलेले रक्त रुग्णाला देण्यापूर्वी ‘एलायझा’च्या चाचण्या करण्याचे बंधन रक्तपेढ्यांवर घालण्यात आले आहे; पण काही रोगाच्या जंतूंचे निदान त्या चाचण्यांमधून होत नाही. त्यासाठी काही नामांकित रक्तपेढ्या या चाचणीबरोबरच अत्याधुनिक रक्तचाचणी करतात. त्यामुळे रुग्णाला सुरक्षित रक्त मिळेल, असा विश्‍वास रक्तपेढ्यांतील डॉक्‍टरांनी व्यक्त केला.   

रक्तपेढ्यांवर कारवाई होणार?
रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या संयोजकांकडून भेटवस्तू दिल्या जातात. या भेटवस्तू देऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना ‘एफडीए’ने दिल्या आहेत. अशा भेटवस्तूंचे वाटप करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरांमध्ये सहभागी होऊ नये, अशा स्पष्ट सूचना ‘एफडीए’च्या पुणे विभागाने रक्तपेढ्यांना दिल्या आहेत; पण या सूचनांकडे दुर्लक्ष करून रक्तपेढ्या शिबिरात सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. त्यावर ‘एफडीए’ कारवाई करणार का, असा प्रश्‍न आता पुढे आला आहे.

रक्तदान ऐच्छिक असले पाहिजे. रक्तदात्यांचा आदर राखण्यासाठी त्यांना रक्तपेढीतर्फे प्रमाणपत्र दिले. ऐच्छिकतेला बाधा येईल, अशी कोणतीही भेटवस्तू देऊ नये. नियमित रक्तदान ही काळाची गरज आहे. त्यातून रक्ताची गरज भागेल.
- डॉ. दिलीप वाणी, राष्ट्रीय अध्यक्ष, जनकल्याण रक्तपेढी आणि वैद्यकीय सेवा

असा असावा रक्तदाता

सेवा - रक्तदान ही सेवा म्हणून करणारा 
संपर्क - शिबिराची वाट न बघता गरजेच्या वेळी रक्तदान करणारा 
सातत्य - दर तीन महिन्यांनी न चुकता रक्तदान करणारा 
शिस्त - कोणत्याही प्रलोभनाच्या आहारी न जाणारा 

Web Title: gift for blood donation

फोटो गॅलरी