स्वतःवर गोळी झाडून बारामतीतील युवतीची आत्महत्या

मिलिंद संगई
रविवार, 16 एप्रिल 2017

सायली हिचे वडील सैन्यात कार्यरत असून ते कर्तव्य बजावत आहेत. या घटनेनंतर बळी कुटुंबियांना कमालीचा मानसिक धक्का बसला.

बारामती : मानसिक नैराश्यातून येथील संध्या उर्फ सायली मानसिंग बळी (वय 17) या महाविद्यालयीन युवतीने काल (शनिवार) रात्री स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या अचानक झालेल्या आत्महत्येने बळी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.

फौजदार प्रशांत काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री नऊच्या सुमारास सायली बळी हिने घरात असलेल्या गावठी कट्ट्यातून डोक्यात एक गोळी मारुन घेतली. ही गोळी तिच्या कपाळातून आरपार जाऊन बाहेर पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

गेल्या वर्षी सायली तिची आई व भावासह बारामतीत महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आलेले होते. यापूर्वी ती पंजाबमध्ये शिकायला होती, मात्र आपल्यावर कोणी प्रेमच करत नाही माझे लाड केले जात नाही या वैफल्यातून तिने हे कृत्य केल्याचे काळे यांनी नमूद केले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती, त्यात ही बाब उघड झाली आहे. सायली हिचे वडील सैन्यात कार्यरत असून ते कर्तव्य बजावत आहेत. या घटनेनंतर बळी कुटुंबियांना कमालीचा मानसिक धक्का बसला. तिच्या शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.