"अभ्यासाच्या संधीचं सोनं कर... कीप इट अप !'..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

पुणे - पुण्यात वाढलेला, शिकलेला अक्षय इतर मुलांच्या सारखाच उच्च शिक्षण घ्यायला इंग्लंड-अमेरिकेत जाण्याचं स्वप्नं उराशी बाळगलेला. अंगभूत बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर तो त्याचं स्वप्नं खरं करत इंग्लंडमध्ये जाऊनही पोचला. पण दोन वर्षांपूर्वी साहेबाच्या देशात जाताना त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं की, येणाऱ्या काळात त्याला तिथल्या थेट भावी पंतप्रधानांनाच जाऊन भेटण्याची संधी मिळेल म्हणून !... आणि आकाशला ही मोलाची संधी एकदा नव्हे, तर तब्बल तीनवेळा मिळाली.

पुणे - पुण्यात वाढलेला, शिकलेला अक्षय इतर मुलांच्या सारखाच उच्च शिक्षण घ्यायला इंग्लंड-अमेरिकेत जाण्याचं स्वप्नं उराशी बाळगलेला. अंगभूत बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर तो त्याचं स्वप्नं खरं करत इंग्लंडमध्ये जाऊनही पोचला. पण दोन वर्षांपूर्वी साहेबाच्या देशात जाताना त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं की, येणाऱ्या काळात त्याला तिथल्या थेट भावी पंतप्रधानांनाच जाऊन भेटण्याची संधी मिळेल म्हणून !... आणि आकाशला ही मोलाची संधी एकदा नव्हे, तर तब्बल तीनवेळा मिळाली. हो, पुणेकर अक्षय साळवे या पंचवीशीतल्या तरुणाला ब्रिटनच्या नवनियुक्त पंतप्रधान थेरेसा मे यांना भेटता आलं; त्यांच्यासोबत काही विषयांवर काही वेळ चर्चाही करता आली. त्याने हा अनुभव खास "सकाळ‘शी शेअर केला...

पुण्यातून 2014 मध्ये एमबीए झाल्यावर पुढे ब्रिटनमधल्या मिडलसेक्‍स विद्यापीठात अक्षयने प्रवेश घेतला. तिथून व्यवस्थापनातली अजून एक पदवी मिळवतानाच अभ्यासाचा भाग म्हणून लंडनमधल्या प्रतिष्ठित अशा महापालिका निवडणुकांचा (लंडन मेयर इलेक्‍शन्स) प्रत्यक्ष अभ्यास त्याला करता आला. याच चार महिन्यांत त्याला बलाढ्य अशा हुजूर पक्षाच्या मुख्य कार्यालयात अनेक राजकीय घडामोडी अनुभवता आल्या. ऐतिहासिक "ब्रेक्‍झिट‘चा कौल आणि थेरेसा यांची भेट हे अनुभवही त्यातलेच.

अक्षय कधीही विसरू शकणार नाही असा तो दिवस होता 7 एप्रिल 2016 चा. तो थेरेसा मे यांना प्रत्यक्ष भेटला! फार नाही... साधारणतः पाच ते सातच मिनिटे थेरेसांशी त्याला संवाद साधता आला, पण त्यातही त्यांनी त्याची; त्याच्या देशाची, पुण्याची आणि त्याच्या आवडी-निवडींची आस्थेवाईकपणे केलेली विचारपूस त्याला आजही लक्षात आहे. ""त्यांनी माझ्या उत्साहाला प्रोत्साहन दिलं आणि मला "ऑल द बेस्ट‘ म्हणत "तुला इथे जी अभ्यासाची संधी मिळतेय तिचं सोनं कर. कीप इट अप!‘ अशी पाठही थोपटली,‘‘... अक्षय सांगत होता.

महत्त्वाकांक्षी, कणखर, "पीपल ओरिएंटेड‘ थेरेसा...
अक्षय म्हणाला, ""समोरच्या प्रत्येकाविषयी- अगदी उच्चभ्रू ते सर्वसामान्य कुणीही असूदेत- थेरेसा यांना त्यांचा निरातिशय आदर असल्याचं मला त्यांना भेटल्यावर जाणवलं. त्यांचा कामाचा उरक आणि उत्साह तर प्रचंडच. कॅमेरॉन यांच्या मंत्रिमंडळात त्या गृहमंत्री असताना त्यांनी जे लोककल्याणकारी निर्णय घेतले, त्यानंतर तर "पीपल ओरिएंटेड लीडर‘ हे त्यांचं बिरूद पक्कंच झालं. मनमोकळ्या, महत्त्वाकांक्षी, कणखर, कामाच्या गुणवत्तेविषयी ठाम अन्‌ आग्रही, कृतिशील, एखाद्याला एकदाच भेटल्या, तरी त्याच्याशी स्वतःला जोडून घेणाऱ्या... अशी त्यांची कितीतरी वैशिष्ट्ये सांगता येतील. आशिया आणि भारताविषयी मृदू भावना असणाऱ्या थेरेसा यांच्याकडे ब्रिटनमधले नागरिक "दुसऱ्या मार्गारेट थॅचर‘ म्हणूनच अपेक्षेने पाहताहेत.‘‘

स्पष्टवक्ता; प्रतिमा जपणारा हुजूर पक्ष
आपल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या इंटर्नशीपचा भाग म्हणून अक्षयला ब्रिटनमधल्या "कॉन्झर्व्हेटिव्ह‘ अर्थात हुजूर पक्षासोबत काम करण्याचा अनुभव मिळाला. उण्यापुऱ्या चार-साडेचार महिन्यांचा हा अनुभव असला, तरीही तो ब्रिटनमधल्या राजकारणाविषयी, तिथल्या समाजकारणाविषयी... आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ब्रिटीश मानसिकतेविषयी अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी शिकवून गेल्याचं अक्षय आवर्जून सांगतो. हुजूर पक्षातले जवळपास सर्वजण स्पष्टवक्ते, प्रत्येक गोष्ट चोख होण्याचा आग्रह धरणारे आणि आपली प्रतिमा जपणारे होते. महत्त्वाचं म्हणजे ते इतरांचा आदर करणारे जाणवले, असंही त्यानं सांगितलं.