मोलकरणींनी लुबाडले 38 लाखांचे सोने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

पुणे - कौटुंबिक वादाचा गैरफायदा घेत मोलकरणींनी भोंदू महिलेच्या मदतीने 38 लाखांचे सोने लुबाडल्याची घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने भोंदू महिलेसह दोन मोलकरणींना आणि सराफाला अटक केली. त्यांच्या ताब्यातून 34 लाख रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.

अंबिका भगतसिंग मिझाड (वय 39, रा. आईमाता मंदिराजवळ, बिबवेवाडी), राधिका चक्रधर सोनार (वय 34, रा. सरगम चाळ, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या मोलकरणींची नावे आहेत. तसेच, रेशम्मुनिस्सा रफिक सय्यद (वय 43, रा. ढोले मळा, सॅलिसबरी पार्क) या भोंदू महिलेसह नरेशकुमार किसाराम चौधरी (वय 40, रा. बिबवेवाडी) यालाही अटक केली आहे.

दीपक उत्तमचंद जैन-चोरडिया (रा. सॅलिसबरी पार्क) यांच्या घरातून 38 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता. वरिष्ठ निरीक्षक सीताराम मोरे यांना एका सराफाने चोरीचा ऐवज घेतल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता मोलकरणींचे पितळ उघडे पडले.

कौटुंबिक कलहाचा फायदा
दीपक जैन यांचे पहिल्या पत्नीसोबत भांडण होत होते. मिझाड आणि सोनार या मोलकरणींनी जैन यांच्या कौटुंबिक कलहाचा फायदा घेण्याचे ठरवले. त्यांनी जैन यांच्या पत्नीची ओळख सय्यद नावाच्या भोंदू महिलेशी करून दिली. तिने जैन यांच्या पत्नीला विश्वासात घेतले. त्यानंतर तिने बॅंकेच्या लॉकरमधील सोने घरी आणून ठेवण्यास सांगितले. या दागिन्यांमध्ये वाईट शक्ती असल्याच्या बहाण्याने दागिने घरात विशिष्ट ठिकाणी ठेवण्यास सांगून ते लंपास केले.