वस्तू व सेवा करातून अन्नधान्य वगळण्याच्या निर्णयाचे स्वागत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

पुणे - वस्तू व सेवा करातून (जीएसटी) अन्नधान्य वगळण्याच्या निर्णयाचे किराणा भुसार मालाच्या व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे. त्याचप्रमाणे तेलबिया, साबुदाणा, मिरची, धने, नारळ आदी जीवनावश्‍यक वस्तूंना यातून वगळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. 

पुणे - वस्तू व सेवा करातून (जीएसटी) अन्नधान्य वगळण्याच्या निर्णयाचे किराणा भुसार मालाच्या व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे. त्याचप्रमाणे तेलबिया, साबुदाणा, मिरची, धने, नारळ आदी जीवनावश्‍यक वस्तूंना यातून वगळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. 

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत कराचे दरही जाहीर झाले. अन्नधान्यावर कोणताही कर लागू न करण्याच्या निर्णयाचे दी पूना मर्चंट्‌स चेंबरने स्वागत केले आहे. अध्यक्ष प्रवीण चोरबेले म्हणाले, ""अन्नधान्य आदी जीवनावश्‍यक वस्तूंना जीएसटीमधून वगळावे, यासाठी चेंबरने राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. सामान्य नागरिक आणि व्यापारी यांच्यात सुवर्णमध्य काढणारा हा निर्णय आहे. व्यापाऱ्यांविषयी सर्वसामान्यांच्या मनात असलेले गैरसमज यातून दूर होण्यास मदत होणार आहे.'' फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी या निर्णयाचे स्वागत करतानाच आणखी काही जीवनावश्‍यक वस्तूंवरील जीएसटी रद्द व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ""साखरेवर अबकारी कर लागू आहे, त्याचप्रमाणे काही वस्तूंवर मूल्यवर्धित कर लागू आहे. शेंगदाणा, साबुदाणा या गोष्टी दैनंदिन आहारात वापरल्या जातात. अशा अनेक वस्तूंवरील कर केंद्र सरकारने हटविल्यास निश्‍चितच ग्राहकांना फायदा होईल आणि पारदर्शी व्यापाराला चालना मिळेल,'' असे त्यांनी नमूद केले. 
चेंबरचे माजी अध्यक्ष वालचंद संचेती यांनीही या निर्णयाविषयी समाधान व्यक्त केले. ""जीवनावश्‍यक वस्तू वगळण्यासाठी चेंबरच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला. अन्नधान्य वगळले असले, तरी आणखी काही वस्तूंना यातून सूट मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पुढील काळात प्रयत्न करू,'' असेही त्यांनी सांगितले. शेंगदाण्याचे व्यापारी अनिल लुंकड यांनी तेलबिया, डाळी आदी मालाला करातून वगळणे आवश्‍यक असल्याचे स्पष्ट केले.