शासकीय इमारतींवर साकारणार सौरऊर्जा प्रकल्प 

शासकीय इमारतींवर साकारणार सौरऊर्जा प्रकल्प 

पुणे : महापालिकेच्या इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यास चालढकल होत असल्यामुळे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने शहरातील 42 शासकीय- निमशासकीय संस्थांच्या इमारतींवर हे प्रकल्प उभारण्यासाठी पाऊल टाकले आहे. आयुका, कृषी महाविद्यालय आदी संस्थांचा त्यात समावेश आहे. या संस्थांच्या माध्यमातून शहरातून एक गिगा वॉट सौरऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. 

स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत शहराला लागणाऱ्या ऊर्जेपैकी 10 टक्के ऊर्जा ही अपारंपरिक स्रोतातून निर्माण करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या 34 इमारतींवर रूफ टॉप सोलर ऊर्जा प्रकल्प बसविण्याचा प्रस्ताव स्मार्ट सिटी कंपनीने महापालिकेला दिला होता. त्यानुसार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव सहा महिन्यांपूर्वी मंजूर झाला; परंतु या इमारतींवर प्रकल्प बसविण्यास महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनीला परवानगी दिली नाही.

या पार्श्‍वभूमीवर स्मार्ट सिटी कंपनीने आता 42 शासकीय, निमशासकीय संस्थांवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी त्यांच्या इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प बसवावेत, अशी पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. त्याला पुणे विद्यापीठाने अनुकूल प्रतिसाद दिला असून, तेथे 14 इमारतींवर प्रकल्प उभारण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयुका, कृषी महाविद्यालय या संस्थाही सकारात्मक आहेत. 

केंद्राची कंपनी करणार गुंतवणूक 
सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी संबंधित संस्थांना कोणताही खर्च येणार नाही. त्या प्रकल्पातून निर्माण होणारी काही वीज माफक दरात संबंधित संस्थांना उपलब्ध होणार आहे. प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकारने काही संस्था नियुक्त केल्या आहेत. त्याच संस्था त्यासाठी गुंतवणूक करणार असून, संबंधित प्रकल्पांची 25 वर्षे देखभाल- दुरुस्तीही करणार आहेत. 

स्मार्ट सिटीचे प्रश्‍न मार्गी लागणार? 
महापालिकेच्या इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प बसविणे, स्मार्ट सिटीच्या हद्दवाढीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करणे यासाठी स्मार्ट कंपनीने नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांच्याकडेही आता पाठपुरावा केला आहे. त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे रेंगाळेले प्रकल्प आता मार्गी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

या आहेत प्रमुख संस्था 
खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड, एनसीएल, डीआरडीओ, आयटीआय- औंध, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, सेंटर फॉर पोलिस रिसर्च, आयुका, कृषी महाविद्यालय, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. 

पुणे ही सोलर सिटी व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. पुढच्या टप्प्यात वीज मागणी जास्त त्या ठिकाणी सोलरचे प्रकल्प बसविण्याचे नियोजन आहे. तसेच पथदिवे, बसथांबे यांच्यासाठी सौरऊर्जा वापरण्याचे नियोजन आहे. ई-व्हेइकलला चार्जिंगसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठीही नियोजन सुरू आहे. 
- राजेंद्र जगताप, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com