शासकीय कार्यालये शहरात आणणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

पिंपरी - शहरात इस्राईलच्या धर्तीवर शाळांची उभारणी, तीन लाखांपर्यंत आरोग्य विमा, सरकारी अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालय, प्राधिकरणात फ्री होल्ड घरे आणि सर्व शासकीय कार्यालये सुरू करणे, नद्यांचे संवर्धन, टॅंकरमुक्‍त सोसायट्या अशी आश्‍वासने भाजपच्या शहर जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.

पिंपरी - शहरात इस्राईलच्या धर्तीवर शाळांची उभारणी, तीन लाखांपर्यंत आरोग्य विमा, सरकारी अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालय, प्राधिकरणात फ्री होल्ड घरे आणि सर्व शासकीय कार्यालये सुरू करणे, नद्यांचे संवर्धन, टॅंकरमुक्‍त सोसायट्या अशी आश्‍वासने भाजपच्या शहर जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शुक्रवारी जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. हा केवळ जाहीरनामा नसून, आमचा वचननामा असल्याचे बापट यांनी सांगितले. सोळापानी जाहीरनाम्यात २७ मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. यात मूलभूत सुविधांसह विविध प्रकल्प अत्याधुनिक करण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र, बोपखेलमधील नागरिकांच्या समस्या, रेडझोनच्या मुद्द्याबाबत या जाहीरनाम्यात उल्लेख केलेला दिसून येत नाही. 

जन-घर योजनेमार्फत शहरातील एक लाख झोपडीधारकांना हक्‍काचे घर मिळवून देण्याचे आश्‍वासन जाहीरनाम्यात प्रसिद्ध केले आहे. प्रत्येक जाती-धर्माच्या नागरिकासाठी सांस्कृतिक हॉलसाठी जागा आरक्षण करण्यात येणार असून, प्रत्येक प्रभागात सांस्कृतिक कला मंचही उभारण्यात येणार आहे. अखंडित भ्रष्टाचाराची मालिका उद्‌ध्वस्त करण्याचे आवाहनही या जाहीरनाम्यातील पहिल्याच पानावर केले आहे. व्यंग्यचित्रांच्या माध्यमातूनही सत्ताधारी राष्ट्रवादीच्या कारभारावर टीका केली आहे. याशिवाय पाच फेब्रुवारी छापलेल्या जाहीरनाम्याने तब्बल १३ दिवसांनंतर प्रकाशन करण्यात आले.

पारदर्शक जाहीरनाम्याच्या पहिल्या आणि शेवटच्या पानावर भारतीय जनता पार्टी-रासप-स्वाभिमानी पक्ष यांची महायुती असे छापण्यात आले आहे. महायुतीच्या या व्याख्येतून रिपब्लिकन पक्षाला वगळण्यात आले असले तरी शेवटून दुसऱ्या पानावर रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे
 मोफत आरोग्य तपासणीसह तीन लाखांपर्यंतचा आरोग्य विमा
 इस्राईलच्या धर्तीवर अत्याधुनिक शाळा उभारणी
 शहरात सरकारी अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालय
 हिंजवडी ते चाकण यांना जोडणारी मेट्रो रेल्वे
 शहरातील सर्व हाउसिंग सोसायट्या टॅंकरमुक्‍त
 सुसज्ज भाजी मंडईसह प्रत्येक प्रभागात आठवडे बाजार सुरू
 सर्व शासकीय कार्यालये व उपकार्यालये सुरू करणार
 सांडपाण्याच्या पुनर्वापरातून वीजनिर्मिती; कचरा व्यवस्थापनात आमूलाग्र बदल
 नद्यांचे संवर्धन व जलपर्यटन केंद्राची उभारणी
 महिला सक्षमीकरण व प्रत्येक भागात स्वच्छतागृहांची उभारणी 
 अनधिकृत प्रश्‍न सोडवून कार्पेट एरियानुसार करआकारणी 
 आनंदी ज्येष्ठत्वासाठी विविध सुविधा 
 अत्याधुनिक सुविधांसह सारथीचे पुनरुज्जीवन