सरकार कुटुंबीयांसाठी सरसावले मदतीचे हात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

पिंपरी - ‘नियतीच्या चक्रव्यूहात कोलमडले ‘सरकार’ असे वृत्त बुधवारी (ता. १७) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच बांधकाम मजूर कालीपद सरकार यांच्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर, तळेगाव दाभाडे परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला.

पाच वर्षांपूर्वी उर्से येथील बांधकाम साइटवर कालीपद यांना विजेचा धक्का बसून ९० टक्के अपंगत्व आले आहे. त्यांची व्यथा ‘सकाळ’ने मांडली व मदतीसाठी अनेकजण पुढे आले. कष्टकरी संघर्ष महासंघाने २५ किलो गहू, तांदूळ, ज्वारी, तेल आदी वस्तू दिल्या. महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, नंदकिशोर राठोड, साईनाथ खंडीझोड, मधुकर वाघ, कासीम तांबोळी, ओमप्रकाश मौर्य, फरीद शेख उपस्थित होते. पिंपळे सौदागर येथील बांधकाम व्यावसायिक संतोष हांडे यांनी शैक्षणिक खर्चासाठी पाच हजार रुपये दिले. 

स्वतःच्या निवृत्ती वेतनातील एक हजार रुपये दरमहा कालीपद यांच्या बॅंक खात्यात जमा करणार असल्याचे चिखलीतील ज्येष्ठ नागरिक टोणकर यांनी सांगितले. जनसेवा सोशल फाउंडेशनचे मनोज वंजारी यांनी तीन हजार रुपये मदत केली. थेरगावमधील सखी नर्सिंग होमतर्फे डॉ. जबीम पठाण यांनी कालीपद यांच्या मुलांना मदत केली. तळेगाव दाभाडे येथील डॉ. शाळिग्राम भंडारी यांनी पाच हजार रुपये देऊ केले आहेत. टाटा मोटर्स कामगार संघटनेचे पदाधिकारी महेंद्र कदम यांनी धान्य स्वरूपात मदत केली.