गुढी उभारू आनंदाची

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

पुणे - वसंत ऋतू, हेमलंबीनाम संवत्सराचा प्रारंभ दिन... गुढीपाडवा... कुलदैवतांसहित पंचांगस्थ श्रीगणेशाचे पूजन... वासंतिक चंदन उटीने भजनांची सुरवात... हिंदू नववर्ष दिनानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुका... घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणारा ब्रह्मध्वज (गुढी)... तोरणे उभारून लक्ष्मीचे पूजन करीत नव्या कार्याचा शुभारंभ दिन म्हणून शहरात उद्या (ता. २८) चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या स्वागतासाठी विविध सामाजिक संस्थांतर्फे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

खरेदीसाठी गर्दी
गुढी उभारण्यासाठी आसाम, नागपूर, चिपळूण, पानशेत, वेल्हा येथून कळक बाजारात आले आहेत. खण-साड्यांसह पूजेच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. मंगळवारी मुहूर्तावर गुढी उभी करायची म्हणून तांब्याचा कलश, कडुनिंबाची डहाळी, आंब्याचा मोहोर, दवणा, फुलांचे हार, गाठ्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. 

जेजुरीचा दवणा
दरवर्षी गुढीपाडव्यासाठी जेजुरीचा दवणा येतो. मात्र तीन वर्षांपासून जेजुरी परिसरात पाण्याअभावी दवण्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरम्यान, कापड बाजार, सोन्या-चांदीच्या पेढ्या, इलेक्‍ट्रॉनिक, इलेक्‍ट्रिकल वस्तूंसहित नानाविध वस्तूंनी दुकाने सजली आहेत. लहानग्यांना चॉकलेट, सुकामेव्यांच्या गाठ्या, तर महिलांना कुंदन वर्कचे नक्षीकाम केलेल्या गाठ्या आकर्षित करीत आहेत. 

पुस्तकांची गुढी
नववर्षाचा पहिला दिवस असल्याने विविध मठ-मंदिरांमध्ये चंदन उटीसहित धार्मिक कार्यक्रम आयोजिले आहेत. पौड रस्त्यालगतच्या आयडियल कॉलनीमध्ये माधव वैशंपायन, लेखक संजय भास्कर जोशी यांच्यातर्फे ‘पुस्तक पेठ’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या मंदिरात महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते गुढीचे पूजन होणार आहे.

मंगळवारी सूर्योदयानंतर सकाळी ८ वाजून २७ मिनिटांपर्यंत फाल्गुन वद्य अमावास्या आहे. त्यानंतर चैत्र शुद्ध प्रतिपदा सुरू होत असून, त्यानंतर गुढी उभी करावी. 
- मोहन दाते, पंचांगकर्ते

४४ ठिकाणी मिरवणुका
‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरातील ४४ ठिकाणांमधून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. यामध्ये महिला, पुरुष पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतील. हिंदू नववर्ष दिन असल्याने नागरिकांना साखरवाटप करणार आहे. तत्पूर्वी शाखास्तरांवर आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांना प्रणाम करण्यात येईल,’’ असे संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यांनी सांगितले.

Web Title: gudhipadava preparation