हडपसरमध्ये ४८ टक्के पाणीकपात

हडपसर - रामटेकडी येथे ८० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम संथ गतीने सुरू आहे.
हडपसर - रामटेकडी येथे ८० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम संथ गतीने सुरू आहे.

हडपसर - भर हिवाळ्यात लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून हडपसरला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ४८ टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे रोज १२३ एमएलडी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात केवळ ७६ एमएलडी पाणी मिळत आहे. परिणामी, कमी दाबाने व अनियमीत पाणीपुरवठा होत आहे. 

रामटेकडीवरील पाण्याची टाकी वांरवार शून्य पातळीला जाते. त्यामुळे लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून अधिकचे पाणी पंपिग करून या टाकीत पाणी भरणे गरजेचे आहे. या बाबत हडपसर, कोंढवा, मुंढवा आणि वानवडी भागांतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. आयुक्त कुणाल कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करून दोन दिवसांत हडपसर विभागास पूर्ववत व नियमित पाणीपुरवठा करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला. 
या प्रसंगी विरोधी पक्ष नते चेतन तुपे, नगरसेवक वैशाली बनकर, चंचला कोद्रे, प्रशांत जंगताप, बंडू गायकवाड, नंदा लोणकर, योगेश ससाणे, चंचला कोद्रे, रूक्‍साना इनामदार, हमीदा सुंडके, परवीन शेख, माजी नगरसेवक सुनील बनकर आदी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाचा समावेश होता. 
या बैठकीला लष्कर पाणीपुरवठा अधिकारी, विद्युत विभागाचे अधिकारी व संबंधित विभागाचे अभियंते उपस्थित होते. 

आठ आठ दिवस पाणीपुरवठा नाही
हडपसर परिसरातील हिंगणे आळी, मगरआळी, रामेशी आळी, पांढरेमळा, गरडूवस्ती, अल्हाट वस्ती, काळेपडळ या भागात आठ-आठ दिवस पाणी येत नाही. हडपसर गावठाण, गाडीतळ, माळवाडी, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, आकाशवाणी, गाडीतळ या भागांत पूर्वी दोन तास पाणी येत होते. सध्या केवळ अर्धा तास पाणी येते. पाण्याची वेळ अनियमित असते.

परिणामी, काही भागात नगरसेवकांकडून टॅंकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र तो पुरेसा नाही. परिणामी, पैसे देऊनही सोसायट्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. रामटेकडीवर नव्याने बांधण्यात आलेली ८० लाख लिटर पाण्याची टाकी वापराविना पडून आहे. लष्कर जलशुद्धीकरण केंद्र हे १०० एमएलडीचे असून, त्याची मुदत संपली आहे.

दुरवस्था झाल्याने ते कोणत्याही क्षणी बंद पडू शकते. त्यामुळे या ठिकाणी नवीन २०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याची मागणी या नगरसेवकांनी केली आहे. लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पावरा म्हणाले, ‘‘लष्कर पाणीपुरवठा ते रामटेकडी टाकीदरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होण्यास सात महिने लागतील.’’

पाणीपुरवठा सुरळीत न होण्याची कारणे
पर्वती येथून लष्कर जलशुद्धीकरण केंद्रात पाणी कमी येते.
नवीन जलवाहिन्या टाकणे गरजेचे
शहरातील काही भागांत चोवीस तास पाणीपुरवठा होतो. 
रामटेकडी येथील पाण्याच्या टाक्‍याची पातळी वारंवार शून्य होते. 
रामटेकडीवर बांधलेल्या नवीन टाकीतून पाणी सोडण्याची आवश्‍यकता. 
दाब कमी असल्याने उंच भागातील नळांना पाणी येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com