तरुणाची आत्महत्या की खून; तपास करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

हडपसर - अजित आत्माराम इंगळे (रा. मंगळवार पेठ, फलटण) या तरुणाने प्रेम प्रकरणातून स्वतःच्या मारुती कारला आग लावून आत्महत्या केल्याचा गुन्हा हडपसर पोलिस ठाण्यात दाखल होता. या प्रकरणी लष्कर न्यायालयाने मृताच्या भावाची बाजू ऐकूण घेतल्यानंतर हडपसर पोलिसांना प्रेयसी व तिच्या नातेवाइकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा तपास करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. एप्रिल 2016 मध्ये हडपसरमधील सातववाडी येथे ही घटना घडली होती.

मृत अजित याचा भाऊ रोहित आत्माराम इंगळे (वय 26) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अजितच्या प्रेयसीच्या आईने मुलगी आत्महत्या करत आहे, असा बहाणा करून अजितला फोन केला. तातडीने अजित फलटण येथून हडपसर येथील प्रेयसीच्या घरी आला. त्यानंतर प्रेयसी व तिच्या नातेवाइकांनी संगनमताने अजितचा घातपात करून खून केला आणि त्याच्याच मारुती कारमध्ये बसवून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला पेटवून दिले. कार पेटून अजितचा जळून मृत्यू झाल्याचा बनाव केला.