'तो' फुलवतोय आनंदवन, मदत करायला याल का?

Anandvan nature organisation
Anandvan nature organisation

आठवड्याभरापूर्वी पुण्यातील एनआयबीएम रोडवरुन जात असताना डाव्या बाजूच्या एका भल्या मोठ्या गेटवर एक पाटी वाचली, "love walking in the forest ? come and help us" पुढे दिवसभर ती पाटी माझ्या डोळ्यासमोर फिरत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी थेट आनंदवन गाठलं. आत पाऊल टाकल्यावर समोर दिसणारे दृश्य थक्क करणारं होतं. सकाळी सातची वेळ, ढगाळ वातावरणामुळे सूर्य आता कुठे कवडसे फेकत होता तर पक्षांच्या चिवचिवाटाने सारा परिसर प्रसन्न झाला होता. थोडं पुढं चालत गेल्यावर चार कोपऱ्यात काही माणसं काहीतरी करत असल्याचं दिसलं. त्यातल्या सर्वात वयस्कर काकांकडे गेल्यावर त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, "तुम्ही आम्हाला मदत करायला आला आहात का?"  मी न राहावून त्यांना विचारलं "कसली मदत काका?" त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने माझ्या मनाचा ठाव घेतला. 

"आम्ही लोकांना ऑक्सिजन देण्याचं काम करतो, तुम्हीसुद्धा मदत कराल का?" 

आणि मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. या आजोबांचं नाव आनंद कुमार. पुण्यातील एनआयबीएम रोडवरील आनंदवनाचे संस्थापक. 13 जुलै 2013 रोजी हे आजोबा देहरादूनहून पुण्यात आले. साधारण चार वर्षांपुर्वी, म्हणजे अगदीच नेमकं सांगायचं झालं तर, 27 जुलै 2013 रोजी एनआयबीएम रोडवरुन चालताना त्यांना बाजूच्या टेकडीवर 400 ते 500 मीटर उंच कचऱ्याचा ढिग दिसला. आणखी जवळ गेल्यावर त्यांना जाणवलं की ही जागा म्हणजे पुणे शहराची कचरापेटीच होती. 100 मीटर पेक्षा जास्त आत जाणे शक्यच नाही हे कळल्यावर ते परत फिरले. पण त्यांनी माघार नाही घेतली. त्याच दिवशी ते पुन्हा तिथं गेले पण जाताना ते सोबत कचरा उचलण्यासाठी लागणारे सामान आणि पिशव्या घेऊन गेले. त्यांचं पहिलं लक्ष्य कचरा साफ करणे इतकचं होतं. तब्बल 18 महिने त्यांनी एकट्यानं हे काम केले. आनंदवनातून त्यांनी 35 ट्रक भरतील एवढा कचरा काढला आणि त्यानंतर तिथे झाडे लावून त्यांना पाणी घालण्याचं काम सुरु केलं. 

काही काळानंतर त्यांच्यासोबत माणसे जोडण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांनी आनंदवन मित्र मंडळाची स्थापना केली व ते त्या टेकडीचे जंगलात रुपांतर करण्याच्या कामाला लागले. हे काम करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीचे दिवस त्यांना रस्त्यावर उभे राहून पाणी विकत घ्यावे लागे. वन मंत्रालयाकडून आनंदवनाला संरक्षक भिंत बांधून देण्यात आली, मात्र त्यानंतर सरकारची जबाबदारी संपल्याचे जणू त्यांनी घोषितच केले. सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही म्हणून आनंदवनाचे काम थांबलेले नाही. मात्र अजूनही लोकांमध्ये जागरुकता नसल्याची खंत आनंद कुमार यांना आहे. 43 एकरच्या भल्या मोठ्या जागेत पूर्ण जंगल उभारणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही, हे तिथं जाऊन श्रमदान केल्याशिवाय कळत नाही. पुण्यातील जवळजवळ 7 शाळांमधील विद्यार्थी आनंदवनात जाऊन श्रमदान करतात, तर आपण का नाही?  

आनंदवनाचा खजिना
आजही आनंदवनात रोज पाच टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो.  लोकांच्या श्रमदानातून आज आनंदवनात पाण्याचे तीन बांध, चार ‘बर्ड वॉटर पेट्स’ आणि 33 हजार झाडे असा डोलारा दिमाखात उभा आहे. आनंदवनात ‘बर्ड प्रकल्प 549’ या नावाने एक मोहिम राबवली जाते. या मोहिमेची सुरुवात 10 पक्ष्यांपासून झाली होती आणि आज साडे तीन वर्षांनंतर आनंदवनात अंदाजे चार लाख पक्षी येतात. आनंदवनात सध्या चौथा बांध बांधण्याचे काम सुरु आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही रोज कष्ट करत आहेत. एकदा पाऊस सुरु झाला की बांधलेल्या सर्व बांधांमध्ये पुरेसा पाणीसाठा होईल, असे मत आनंदवनातील सदस्यांनी व्यक्त केले. 

आनंदवनाचे सामाजिक कार्य
आनंदवनातर्फे प्लॅस्टिक बंदी मोहीम राबविली जाते. आनंदवनातील सदस्यांनी एकत्र येऊन बनवलेल्या कापडी पिशव्यांचे परिसरात वाटप करण्यात आले आहे. येथे चार खड्ड्यांमध्ये झाडांसाठी कंपोस्ट खत तयार करण्यात येतं. आतापर्यंत आनंदवनात 33 हजार झाडे लावून जगवली गेली आहेत. आनंदवनातर्फे फक्त 18 महिन्यांत 28 हजार विद्यार्थ्यांची पर्यावरण कार्यशाळा घेण्यात आली.      

भविष्यातील योजना
लोकांना तणाव, प्रदूषणमुक्त व आरोग्यदायी जीवनशैली देण्यासाठी आनंदवनातील सदस्य प्रयत्नशील आहेत. उंड्री ते हडपसरमध्ये 14.5 किमीचा "ग्रीन कॉरिडोर" बनवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. आनंदवन आणि त्याच्या आजूबाजूची दोन जंगले एकमेकांना जोडण्याची तयारी आता सुरु आहे, ज्यामुळे आनंदवन परिवाराची व्याप्ती वाढेल. ही तीनही जंगले एकमेकांना जोडल्याने टेकड्यांवर होणाऱ्या अनधिकृत अतिक्रमणाला आळा बसेल. 27 जुलै 2017 रोजी वर्धापनदिनानिमित्त 27 हजार लोकांना पर्यावरण कार्यशाळा देण्याचे आनंदवनाचे उद्दिष्ट आहे. या कार्यशाळेत झाडांचा बचाव करणे, झाडांचे संगोपन करणे, माती संवर्धन व त्याचे फायदे अशा विषयावर माहिता देण्यात येणार आहे. 

लोकांसाठी काम करणाऱ्या या संस्थेला आजही सरकार व लोकांकडून मदताची आशा आहे. एका वयोवृद्धाने हाती घेतलेले हे उल्लेखनीय काम आजच्या तरुण पिढीने तडीस नेण्याची गरज आहे. दहा आनंदवन तयार केल्याशिवाय मरण येऊ नये अशी आनंद कुमारांची माफक इच्छा आहे. उतार वयात लोकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या आनंद कुमारांना आपण सर्वांनी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. 27 जुलैला आनंदवनाला भेट देऊन आपण याकडे नक्कीच पहिले पाऊल टाकू शकतो.

आनंदवन संदर्भात माहिती जाणून घ्या - आनंद कुमार (8412055755), www.anandvanpune.org

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com