जेव्हा ‘त्यांनी’ अनुभवलं चित्रपटांचं जग!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

मीसुद्धा छोट्याशा खेड्यातून पुण्यात आलो. मात्र माझ्याकडे स्वप्नं होती. आज मी त्यांच्याच बळावर माझ्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करत आहे. ग्रामीण भागात परिस्थिती हलाखीची असली, तरीही तेथे उत्तम कलाकार असतात. गरज आहे ती त्यांच्या पंखांत बळ भरण्याची. आज चित्रपट क्षेत्रात, तसेच छोट्या पडद्यावर करिअरच्या मोठ्या संधी आहेत. आपल्या कामात सातत्य ठेवल्यास त्यात खूप काही करता येणे शक्‍य आहे.
- मेघराज राजेभोसले अध्यक्ष, मराठी चित्रपट महामंडळ

पुणे - चित्रपट बनतात तरी कसे, ‘शूटिंग’ म्हणजे नक्की काय असतं, चित्रपट महामंडळाचं काम कसं चालतं, सेन्सॉर बोर्ड म्हणजे काय, हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये फरक तो काय... असे एक ना अनेक प्रश्‍न ‘त्यांच्या’ जिज्ञासू डोक्‍यांतून पुढे येत होते आणि प्रत्येक उत्तरागणिक ही जिज्ञासा अधिकच वाढताना दिसत होती. मराठवाड्यातून खास पुण्यात आलेल्या छोटुकल्यांनी आपल्या अनेक प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेतल्याचं पाहायला मिळालं...

‘अंघोळीची गोळी’ आयोजित ‘मामाच्या गावाला जाऊया’ या उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना; तसेच काही अनाथ मुलांना मंगळवारी पुणेभेटीस आणण्यात आले होते. या भेटीदरम्यान त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याशी मनमोकळा संवाद साधता आला.

मराठवाड्यातील दुष्काळी भागांतील या मुलांपैकी कुणाला व्हायचं होतं अभिनेता; तर कुणाला कॅमेरा हाताळायची भारी हौस, कुणाला चित्रपट गीतं लिहिण्याची खूप इच्छा... अशा अनेक मुला-मुलींनी या वेळी आपली स्वप्न उलगडून दाखवली.