...आणि मित्राच्या अपघाताचा त्यांनी घेतला बदला !

rasta
rasta

पुणे : रॉयल बुलेटीअर्स पुणे (आरबीपी) या ग्रुपमधील सदस्य व त्यांचा कर्नाटकमधील एक "रायडर' मित्र बुलेटवरून गुलबर्गा येथून साताऱ्याला रायडिंगसाठी एकत्र आले. अजिंक्‍यतारा परिसरात रायडिंगही झाली. परतीच्या मार्गावर गुलबर्ग्याच्या मित्राचा लोणंद-फलटण रस्त्यावरील तीव्र उतारावर अपघात झाला. गंभीर जखमी झालेल्या मित्राला त्यांनी रुग्णालयात नेऊन वाचविले. त्याचवेळी त्यांनी शपथ घेतली, ती या अपघाताचा बदला घेण्याची ! त्यानुसार सगळ्यांनी अपघातस्थळी भेट दिली. तेथे तीव्र उतार, खड्डे व दिशादर्शक फलक नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी स्थानिकांच्या मदतीने खड्डे बुजविले, रस्त्यावर फलकही लावले. होय, त्यांनी मित्राच्या अपघाताचा बदला घेतला, तो बदला होता असुविधांच्या ठिकाणी सुविधा निर्माण करण्याचा ! 

खर तर "आरबीपी'चे सगळेच सदस्य पक्के बुलेटप्रेमी. त्यातून अनेक देशाच्या कानाकोपऱ्यातील मित्र त्यांनी जोडले. अनेक विधायक उपक्रम राबवित सामाजिक बांधिलकी जोपासली. कर्नाटकच्या गुलबर्गा येथील "बुलेट रायडर' शिवकुमार याचाही "आरबीपी'शी असाच स्नेह जुळला. 8 जुलै रोजी पुण्याच्या "आरबीपी'तील मित्रांबरोबर रायडिंग करण्यासाठी शिवकुमार हा गुलबर्गा येथून 650 किलोमीटरचे अंतर कापून सातारा येथे आला. सर्वांनी एकत्र येऊन अजिंक्‍यतारा परिसरात मनसोक्तपणे रायडिंग केले. त्यानंतर शिवकुमार गुलबर्ग्याच्या दिशेने, तर आरबीपीचे सदस्य पुण्याच्या दिशेने निघाले.

शिवकुमार लोणंद-फलटण रस्त्यावर आला. त्यानंतर मुळीकवाडी येथील रस्त्यावरील तीव्र अपघाती वळण लक्षात न आल्याने त्याचा अपघात झाला. त्यामध्ये शिवकुमारच्या डोक्‍याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्या वेळी स्थानिक हॉटेल व्यावसायिकाने त्याला तेथील रुग्णालयात नेले. नंतर "आरबीपी'च्या सदस्यांनी त्याला पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविले. दरम्यान, आरबीपीच्या सदस्यांनी अपघात घडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. त्या वेळी तेथे खराब रस्ते, तीव्र वळण, दिशादर्शक फलक, रिफलेक्‍टर अशा सुविधांचा अभाव त्यांना जाणवला. शिवकुमारचा अपघात झाला त्याच दिवशी संबंधित ठिकाणीच आणखी दोन अपघात झाले. त्यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागल्याची माहितीही त्यांना मिळाली. शिवकुमारवर पुण्यात उपचार सुरू असतानाच अपघाताचे कारण शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न सुरू केले. 

विधायक कार्यातून वेगळा पायंडा 
खराब रस्त्यावरील खड्डे व रस्त्याशेजारील खडकाळ भाग मुरूम, माती टाकून बुजविण्याचे काम "आरबीपी'ने केले. त्यानंतर तीव्र वळणावर अपघातप्रवण क्षेत्र अशा आशयाचे फलक, रिफ्लेक्‍टर्स लावले. "आरबीपी'च्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून स्थानिक प्रसाद स्टोन क्रशरच्या मालकानेही सहकार्य केले. त्यांच्या मदतीने गजानन सरकाळे, अभिजित पवार, राजेश वीर, प्रकाश भिलारे, संकेत पाटील, मिलिंद कदम, संदीप बाठे, संतोष होनकर्पे आदी कार्यकर्त्यांनी स्वतः श्रमदान केले. त्यानंतर शिवकुमारचे प्राण वाचविणारे, तसेच या कामासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानही केला. व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा स्वतः पुढाकार घेऊन मित्राच्या अपघाताचा बदला विधायक कार्य उभारून घेतला. 

शिवकुमारचा अपघात झाला त्याठिकाणी किरकोळ सुविधाही नसल्याचे लक्षात आले. तेथे दिशादर्शक फलक बसविले. स्थानिक व्यावसायिकांच्या मदतीने खड्डे बुजविले व रस्त्याच्याकडेला मुरूम टाकला. शिवकुमारप्रमाणे इतर कोणावर ही वेळ येऊ नये, हाच आमचा उद्देश होता. 
गजानन सरकामे, आरबीपी सदस्य 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com