आरोग्यमंत्र्यांचा आदेश महापालिकेकडून बेदखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

पुणे, - स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी रुग्णालयांच्या धडक तपासणी मोहिमेसाठी तयार करण्यात येणारी भरारी पथके पुणे महापालिकेत अद्यापही स्थापन झालेली नाहीत. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागासह पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) अधिकारी एकत्र आले नसल्याने भरारी पथक वाऱ्यावर राहिल्याची माहिती पुढे आली आहे.

पुणे, - स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी रुग्णालयांच्या धडक तपासणी मोहिमेसाठी तयार करण्यात येणारी भरारी पथके पुणे महापालिकेत अद्यापही स्थापन झालेली नाहीत. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागासह पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) अधिकारी एकत्र आले नसल्याने भरारी पथक वाऱ्यावर राहिल्याची माहिती पुढे आली आहे.

म्हैसाळ (जि. सांगली) येथील स्त्रीभ्रूणहत्याकांडाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोग्य खात्याने राज्यातील प्रत्येक रुग्णालय तपासण्याची धडक मोहीम आखली. महापालिकांसह राज्याच्या ग्रामीण भागात 15 मार्च ते 15 एप्रिलदरम्यान मोहीम राबविण्याचे आदेश राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले. आठवड्याभरानंतरही या आदेशाची पुणे महापालिकेत अंमलबजावणी झालेली नाही. फक्त कागदी घोडे नाचवून ही पथके स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे दाखविले जात असल्याचे पुढे आले आहे.

गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायदा, गर्भपात कायदा आणि बॉंबे नर्सिंग ऍक्‍ट शहरातील प्रत्येक प्रसूतिगृह, सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांची तपासणी करण्याची जबाबदारी स्थापन होणाऱ्या पथकांवर सोपविण्यात आली आहे. प्रत्यक्षात हे पथक महापालिकेत स्थापन झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. नरेंद्र ठाकूर म्हणाले, 'भरारी पथकांच्या स्थापनेसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिस खात्याला पत्र पाठविले आहे. मात्र, त्यांनी यासाठी अधिकारी नियुक्त केलेले नाहीत. मात्र, बॉंबे नर्सिंग ऍक्‍टनुसार प्रसूतिगृहांची नियमित तपासणी सुरू आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये 75 प्रसूतिगृहांची तपासणी झाली आहे. त्यापैकी एकाही ठिकाणी कोणत्याही त्रुटी आढळल्या नाहीत. ही तपासणी मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार आहे.''

औषधाशी संबंधित कोणती घटना असल्यास औषध निरीक्षक तातडीने तेथे पोचतील, अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे देण्यात आली. या विभागात मनुष्यबळ कमी आहे. मार्चअखेरची कामे आणि तपासण्यांचे लक्ष्य पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी स्थापन केलेल्या भरारी पथकांत सहभागी होण्याबाबत येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असमर्थता व्यक्त केली.

Web Title: health minister order ousted by municipal