हीरो बनण्यास निघालेला मुलगा पालकांच्या ताब्यात

दौंड - हरियाना येथून गोव्याकडे निघालेला रतन (डावीकडून तिसरा).
दौंड - हरियाना येथून गोव्याकडे निघालेला रतन (डावीकडून तिसरा).

दौंड - चित्रपटसृष्टीत करिअर करण्यासाठी कुटुंबीयांना न सांगता हरियाना येथून गोव्याकडे निघालेल्या एका अल्पवयीन मुलास दौंड लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. चित्रपटात दाखवितात त्याप्रमाणे स्वतःचे गाव सोडून अन्यत्र नशीब आजमावत हीरो होण्यासाठी निघालेल्या या मुलाच्या विलक्षण आकर्षणाने पालक हवालदिल झाले आहेत.  
दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवसिंग बाविस्कर यांनी आज याबाबत माहिती दिली. खासगी वाहतूक निरीक्षक असलेले रामवीर कागडा यांचा थोरला मुलगा रतन रामवीर कागडा (वय १५, रा. फतेहाबाद, हरियाना) हा २० मे रोजी कुटुंबीयांना न सांगता घरातून तीस हजार रुपये घेऊन निघाला. फतेहाबाद येथून नवी दिल्ली येथे तो पोचला. घरात कोणताही कलह झालेला नसताना गोव्यात छोटे मोठे काम करून उपजीविका करून हिरो होण्याचे त्याने ठरविले होते. 

दरम्यान, रतन कागडा बुधवारी (ता. २३) गोवा एक्‍स्प्रेसने दौंड रेल्वे स्थानकावर उतरला. रात्री गस्तीवर असणाऱ्या पथकातील पोलिस नाईक श्रद्धा पठारे, आनंद वाघमारे, संतोष कांबळे, दत्तात्रेय खोत व हर्षल तोरणे यांना तो बावरल्याचे लक्षात आल्याने त्यांनी त्याला विश्वासात घेतले. त्याला जेवण दिल्यानंतर त्याने घरातून निघून येण्याचे कारण सांगितले. स्वतःकडे मोबाईल नव्हता; परंतु त्याला वडिलांचा मोबाईल क्रमांक पाठ असल्याने तो सांगितल्यानंतर पोलिसांनी वडिलांशी व फतेहाबाद शहर पोलिसांशी संपर्क साधला. त्याचे वडील व फतेहाबाद पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल झाले. 

सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रतन यास त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. रतनच्या या वागणुकीचा त्याच्या वडिलांना प्रचंड राग होता; परंतु लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगा सापडल्याचा आनंद ते लपवू शकले नाहीत. रतन कागडा हा इयत्ता नववी उत्तीर्ण असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com