ऐतिहासिक साक्षरता वाढण्याची गरज : डॉ. दीक्षित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

पुणे : ""देशात इतिहासाबाबत संवेदनशील वातावरण निर्माण झाल्याने असहिष्णुता वाढू लागली आहे. त्यातच एखाद्या विषयावर टिप्पणी करताना सामाजिक निर्बंध (सोशल सेंसरशिप) लादले जातात. हे वातावरण बदलण्यासाठी समाजात ऐतिहासिक साक्षरता वाढविण्याची गरज आहे,'' असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या "आंतरप्रणाली अभ्यासकेंद्रा'चे प्रमुख (मानवविद्या आणि सामाजिक शास्त्रे) डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.

डॉ. स्टुअर्ट गॉर्डन लिखित आणि र. कृ. कुलकर्णी यांनी मराठीत अनुवाद केलेल्या "देशमुख-वतनदार, छत्रपती-पेशवा-द मराठाज्‌' या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी झाले. या वेळी डॉ. दीक्षित बोलत होते. मुंबई येथील एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष श. गं. काळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. डॉ. स्टुअर्ट गॉर्डन व डायमंड पब्लिकेशन्स नीलेश पाष्टे उपस्थित होते.

डॉ. दीक्षित म्हणाले, ""इतिहासविषयक साक्षरता वाढविण्यासाठी संशोधनाला वाट देणारे उपक्रम राबविले जावे. समाजात अभ्यासाची वृत्ती वाढविण्यासाठी प्रबोधन व्हावे. मराठ्यांचा इतिहास उलगडण्यात देशातील इतिहासकार कमी पडले आहेत. त्यामुळे इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला परकीय इतिहासकारांवर अवलंबून राहावे लागते. आपण चिकित्सक पद्धतीने मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केलेला नाही. त्यामुळे परकीय इतिहासकारांविषयी दूषित मानसिकता आपल्यात आहे. ती बाजूला सारून भाषांतरित पुस्तकांच्या निर्मितीला प्राधान्य द्यावे.''

काळे म्हणाले,""आपण इतिहासाबद्दल खूप संवेदनशील आहोत. त्याच्यात भावनिकदृष्ट्या आपण गुंतलो आहोत. ही परिस्थिती बदलावी.'' डॉ. गॉर्डन म्हणाले, ""या पुस्तकातून मराठ्यांचा सामाजिक व आर्थिक इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे.''