बुरा ना मानो होली है...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

पिंपरी - ‘बुरा ना मानो होली है...रंग बरसे भिगे चुनरिया..रंग बरसे... ’ असे म्हणत धम्माल, मस्तीत सोमवारी (ता. १३) धुलिवंदनाचा सण शहरवासीयांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. सलग तिसऱ्या दिवसाची सुटी आज पिंपरी-चिंचवडकरांनी धुळवडीच्या रंगात न्हाऊन साजरी केली. 

पिंपरी - ‘बुरा ना मानो होली है...रंग बरसे भिगे चुनरिया..रंग बरसे... ’ असे म्हणत धम्माल, मस्तीत सोमवारी (ता. १३) धुलिवंदनाचा सण शहरवासीयांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. सलग तिसऱ्या दिवसाची सुटी आज पिंपरी-चिंचवडकरांनी धुळवडीच्या रंगात न्हाऊन साजरी केली. 

पिंपरी-चिंचवड शहरात आज धुळवडीनिमित्त तरुणाई सप्तरंगात न्हाऊन गेली. रविवारी रात्री (ता. १२) होळीचा सण उत्साहात झाला. शहरातील विविध ठिकाणी पारंपरिक होळी पेटविण्यात आली. यात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. होळीच्या दुसऱ्या दिवशी शहरात धुळवड साजरी केली जाते. या पार्श्‍वभूमीवर सकाळपासूनच शहरात धुलिवंदनाचे रंग खेळण्यासाठी आबालवृद्ध, गृहिणी, मित्रमैत्रिणी सकाळपासून रस्त्यावर उतरले. प्राधिकरण, सिद्धिविनायक नगरी, आकुर्डी रेल्वे स्टेशन, रावेत, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी अशा ठिकाणच्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रंग उधळत डीजेच्या तालावर नाचणाऱ्या छोट्या कंपनीसोबत मोठ्यांनीही ताल धरत रेन डान्स केला. 

काळेवाडी, आकुर्डी, निगडी भोसरी सारख्या परिसरात कुटुंब व मित्र परिवारासह घराच्या अंगणात धुळवड खेळण्यात आली. काही गृहरचना संस्थांमध्ये फक्त लहान मुलांनीच बाटल्यांमध्ये पाणी घेऊन छोट्या-पिशव्या व पिचकाऱ्यांनी रंग खेळले. मोठ्यांनी ठरवून पाण्याचा वापर टाळला. त्यातही डॉ. डी. वाय. पाटील, पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, श्री म्हाळसाकांत विद्यालय, कॅम्प एज्युकेशन, प्रा. रामकृष्ण मोरे कॉलेज, ज्ञानप्रबोधिनी, सिटी प्राइड स्कूल अशा शाळा-कॉलेजमधील बहुतांशी तरुणाई पाणी टाळून फक्त रंगांतच न्हाली. 

कोरडी होळी खेळलेले तरुण-तरुणी रस्तोरस्ती दिसत होते. शहरातील नाक्‍या-नाक्‍यावर समूहाने एकत्रित येत नागरिक एकमेकांवर रंग टाकत होते. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी  ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त होता. 

सोशल मीडियावरून शुभेच्छा
व्हॉट्‌सॲप, फेसबुक अशा सोशल मीडियावरून सकाळपासून सगळ्यांना सचित्र शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमाने केलेल्या ‘धुलिवंदनाला पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या’ आवाहनाला शहरात प्रतिसाद मिळाला. लहान-मोठ्या सर्वांनीच ‘कमीत कमी पाणी वापरून, फक्त एकमेकांना रंग लावून धुलिवंदन खेळल्याचे’ चित्र पाहायला मिळाले.

Web Title: holi celebration pcmc