माणुसकीच्या नात्याचा 'अमृता'नुभव

अन्वर मोमीन
गुरुवार, 12 जुलै 2018

पुणे : वय केवळ एक वर्ष, त्यात जडलेला दुर्धर आजार, तासा तासाला खालवणारी प्रकृती, उपचार मिळावेत म्हणून मोलमजुरी करणाऱ्या आईवडीलांची सुरू असलेली उलघाल, परंतु महागड्या उपचारांपुढे त्यांचा खचलेला धीर..अशातच वडगाव शेरीतील चार तरूण पुढे येतात आणि निरपेक्ष भावनेने उपचाराचा खर्च उचलतात. महागडी असलेली पाच इंजेक्शन उपलब्ध झाल्याने चिमुकलीवर उपचारांचा मार्ग सुकर होतो. माणुसकीचा असा 'अमृता'नुभव आज ससुन सर्वोपचार रूग्णालयात अनुभवास आला.

ससून मध्ये दुर्धर आजारासाठी दाखल असलेल्या या मुलीचे नाव अमृता दत्ता चांदणे असे आहे. तीच्या उपचारासाठी आवश्यक महागडी इंजेक्शन ससुनमध्ये उपलब्ध नव्हती. पालकांची महागडी इंजेक्शन घेण्यासाठी आर्थिक कुवत नसल्याने त्यांनी ससुनच्या समाजसेवा विभागामार्फत अभ्यागत समिती सदस्या बागेश्री मंथालकर यांच्याशी संपर्क साधला. बागेश्री यांनी वडगाव शेरीतील  भारतीय जनता पक्षाचे शहर चिटणीस महेंद्र गलांडे यांच्याशी संपर्क करून मदतीसाठी विचारणा केली. त्याला लागलीच प्रतिसाद देत महेंद्र गलांडे व त्यांच्या मित्रांनी स्वखर्चाने गुरूवारी (दि. 12) ही इंजेक्शने उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे उपलब्ध करून दिली. त्यामुळे या मुलीवर पुढील उपचार सुरू झाले.

अमृताचे आईवडील देवळाली (ता. करमाळा, सोलापुर) येथील रहिवाशी आहेत. ते मोलमजुरी करतात. मात्र मुलगी अमृताला दुर्धर आजार झाल्याने व त्यावरील इलाजाचा खर्च परवडत नसल्याने त्यांनी गावावरुन थेट ससून रुग्णालय गाठले. अमृताच्या शरीरातील अनेक अवयव काम करत नसून 'न्यूरॉन' पेशी बाधीत झाल्या आहेत. त्यामुळे तिच्या शरीरारातील रोगप्रतिकारक शक्ती अकार्यक्षम झाली असून पायांमध्येही ताकद राहिलेली नाही. अमृताच्या उपचारासाठी अलब्युमीनची पाच इंजेक्शन तातडीने आवश्यक होती. मात्र ही इंजेक्शन ससूनमध्ये उपलब्ध नसल्याने अमृताच्या उपचारांमध्ये अडथळा निर्माण झाला होता.  

महेंद्र गलांडे यांनी या इंजेक्शनविषयी चौकशी केली असता एका इंजेक्शनची किंमत सुमारे पंधरा हजार असल्याचे त्यांना समजले. मात्र अनेकठिकाणी चौकशी केल्यानंतर एका विक्रेत्याने हे इंजेक्शन प्रत्येकी सुमारे सहा हजारात देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर गलांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोवीस हजारांची चार इंजेक्शने खरेदी करून ससून प्रशासनाकडे सुपूर्त केली. तसेच पाचव्या इंजेक्शनाची आर्थिक मदतही दिली.   

यासाठी  महेंद्र गलांडे यांसोबत त्यांचे मीत्र उद्योजक चंद्रकांत पगारिया, संजय पाखराणी, गणेश बेंद्रे यांनी आर्थिक मदत केली. यावेळी ससूनच्या समाजसेवा अधीक्षक विभागाचे प्रमुख एम. बी. शेळके, अभ्यागत समिती सदस्या बागेश्री मंथालकर, समाजसेवा अधीक्षक नंदबोधी पगारे, मोहनिश निकम उपस्थित होते. 

Web Title: Humanity's relationship good experience