मंगळवार पेठेतील झोपड्या हटविल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

पुणे - मंगळवार पेठेतील बोलाईखाना झोपडपट्टीत पुनर्वसन प्रकल्प राबविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) तर्फे गुरुवारी येथील झोपड्या हटविण्यात आल्या. ‘एसआरए’चे वरिष्ठ अधिकारी आणि शंभरहून अधिक पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई केली.

पुणे - मंगळवार पेठेतील बोलाईखाना झोपडपट्टीत पुनर्वसन प्रकल्प राबविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) तर्फे गुरुवारी येथील झोपड्या हटविण्यात आल्या. ‘एसआरए’चे वरिष्ठ अधिकारी आणि शंभरहून अधिक पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई केली.

विकसक केतन विरा यांच्या ‘कामिल रिॲलिटी’च्या वतीने बोलाईखाना झोपडपट्टीच्या ठिकाणी ‘एसआरए’चा प्रकल्प राबविण्यात येणार होता. मात्र, अपात्र रहिवाशांकडून होणाऱ्या विरोधामुळे जागा ताब्यात घेण्यास अडचणी येत होत्या. यासंदर्भात प्रशासनाने अपात्र झोपडीधारकांना नोटीस बजावली होती. त्यानुसार ‘एसआरए’च्या तहसीलदार व सक्षम प्राधिकारी गीता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून या कारवाईला सुरवात झाली. काही झोपडीधारकांनी कारवाईला विरोध केला. मात्र, गायकवाड यांनी समजूत काढल्यानंतर कारवाईचा मार्ग मोकळा झाला. पात्र झोपडीधारकांना रामटेकडी येथील संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. ‘एसआरए’च्या अधिकारी राधिका हावळ- बारटक्के यांच्यासह अधिकारी व कर्मचारी, सहायक पोलिस आयुक्त नीलेश मोरे, समर्थ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मोहिते आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारची ‘सर्वांसाठी घरे’ ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्याअंतर्गत झोपडीधारकांना चांगली घरे मिळावीत, त्यांच्या आयुष्याला चांगली दिशा मिळावी, यासाठी अधिकाधिक प्रकल्प पूर्ण करण्यास ‘एसआरए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी प्राधान्य दिले आहे. 
- गीता गायकवाड, तहसीलदार

Web Title: huts remove in mangalwar peth