शंका असतील तर आयोगाला कळवा  - सुधीर ठाकरे

शंका असतील तर आयोगाला कळवा  - सुधीर ठाकरे

पुणे - ""लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील मुलाखतीचा टप्पा सर्वांत महत्त्वाचा असून, यात दिलेल्या गुणांवर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते. या टप्प्यातील दोन पॅनलद्वारे देण्यात येणाऱ्या गुणांमध्ये तफावत असते, अशी काही विद्यार्थ्यांची तक्रार असते. त्यावर विचार होण्याची आवश्‍यकता आहे. मुलाखत घेणाऱ्या पॅनलबाबत विद्यार्थ्यांच्या मनात शंका असतील, तर त्यांनी तसे आयोगाला कळवावे. त्याप्रमाणे आयोगाला आणखी सुधारणा करता येतील आणि अधिकाधिक पारदर्शकता आणता येईल,'' असे मत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी व्यक्त केले. 

द युनिक ऍकॅडमीतर्फे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2016 मध्ये घेतलेल्या परीक्षेत यशस्वी झालेल्या 88 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते. या वेळी ऍकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, मनोहर भोळे, नरेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. 

ठाकरे म्हणाले,""लोकसेवा आयोगाने काळानुरूप सुधारणा करून अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचा कायमच प्रयत्न केला आहे; परंतु आणखी सुधारणा करण्याची गरज नाही, असे मी म्हणणार नाही; परंतु आयोगाची परीक्षा पद्धती चांगली असून पारदर्शी आहे, हे मी निश्‍चित सांगेल.'' 

या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले. प्रास्ताविक जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन भारत पाटील आणि महेश शिरापूरकर यांनी केले. 

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाल दिव्याच्या गाडीचा मोह धरू नये. लोकांचे प्रश्‍न कसे सोडविता येईल, याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. एकाग्रवृत्तीने अभ्यास करत राहिले पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. मनात कधीही नैराश्‍य येऊ देऊ नये. 
- भूषण अहिरे, राज्यसेवा परीक्षेत प्रथम 
 

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम ठरविला पाहिजे. त्याबरोबरच स्वत:च्या प्रयत्नांशी प्रामाणिक राहावे. वेळेचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण अधिकारी झालो आहोत, हे प्रत्येकाने कायम लक्षात ठेवायला हवे. 
- पूनम पाटील, राज्यसेवा परीक्षेत मुलींमध्ये प्रथम 

* स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टिप्स 
- एकाग्रवृत्तीने अभ्यास करा. 
- कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. 
- आत्मपरीक्षणही महत्त्वाचे आहे. 
- किती अभ्यास करता, यापेक्षा कसा अभ्यास करता याला महत्त्व द्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com