मर्यादेची रक्कम आठवड्यात न मिळाल्यास "लॅप्स' होणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

पुणे - बचत वा चालू खात्यातून पैसे काढण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेने घालून दिलेल्या मर्यादेइतकी रक्कम बॅंकेकडून आठवडाभरात न मिळाल्यास पुढील आठवड्यात ती "कॅरी फॉरवर्ड' न होता "लॅप्स' होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

पुणे - बचत वा चालू खात्यातून पैसे काढण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेने घालून दिलेल्या मर्यादेइतकी रक्कम बॅंकेकडून आठवडाभरात न मिळाल्यास पुढील आठवड्यात ती "कॅरी फॉरवर्ड' न होता "लॅप्स' होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

पाचशे व हजार रुपयांच्या चलनी नोटांवरील बंदीचा निर्णय जाहीर करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व नंतर रिझर्व्ह बॅंकेनेही बचत खात्यातून दर आठवड्याला 24 हजार रुपये; तर चालू खात्यातून 50 हजार रुपये काढता येतील, असे स्पष्ट केले होते. तथापि, चलनी नोटांच्या तुटवड्यामुळे शहरातील बहुतेक सर्वच बॅंकांना आपल्या खातेदारांना या मर्यादेइतकी रक्कम उपलब्ध करून देणे शक्‍य झालेले नाही. काही सहकारी बॅंकांनी तर खातेदारांना आठवडाभरात अवघे एक हजार रुपयेच दिले. त्यामुळे बॅंकेकडे रक्कम उपलब्ध होताच आपली राहिलेली रक्कम पुढील आठवड्यात मिळेल, असे खातेदारांना वाटत होते; परंतु ही शक्‍यता अनेक बॅंकांच्या व्यवस्थापकांनी फेटाळून लावली आहे.

एका आघाडीच्या मल्टिस्टेट को-ऑप. बॅंकेच्या शाखा व्यवस्थापिका म्हणाल्या, की प्रत्येक खातेदाराला मर्यादेइतकी रक्कम देणेही सध्या शक्‍य होत नाही. त्यामुळे मागील आठवड्यात राहिलेली रक्कम देणे तर दूरच. त्याबाबत कोणतेही स्पष्ट आदेश आलेले नाहीत. महाराष्ट्र राज्य अर्बन बॅंक्‍स फेडरेशनचे अध्यक्ष व रिझर्व्ह बॅंकेच्या टास्क फोर्स फॉर अर्बन बॅंक या समितीचे सदस्य विद्याधर अनास्कर यांनी या प्रश्नावर रिझर्व्ह बॅंकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली; परंतु त्यांनीही कोणत्याही कारणास्तव काढता न आलेली रक्कम पुढील आठवड्यात "कॅरी फॉरवर्ड' करण्याबाबत अमर्थता दर्शविली असल्याचे श्री. अनास्कर यांनी स्पष्ट केले.

विवाहासाठी अडीच लाख रुपये उपलब्ध करून देण्याच्या घोषणेप्रमाणेच खातेदाराला दर आठवड्याला 24 वा 50 हजार रुपये देण्याची घोषणाही पोकळ ठरणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

Web Title: If you do not limit the amount of the week laps