...तर वाहन अनधिकृतच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

पुणे - 'बीएस-3' वाहनांची 31 मार्च रोजी विक्री झाली असेल आणि त्या व्यवहाराची रात्री बारा वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद केलेली नसेल किंवा शहराबाहेरील व्यक्तीस वाहन विकले असेल आणि तात्पुरता परवाना घेतला नसेल, तर या वाहनांची एक एप्रिलपासून नोंदणी होणार नाही. ती वाहने अनधिकृत समजली जातील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार "बीएस-3' वाहनांची आज, शनिवारपासून आरटीओकडे नोंदणी केली जाणार नाही. त्यामुळे उत्पादक आणि वितरकांकडे उपलब्ध असलेल्या सर्व वाहनांची एका दिवसात विक्री करण्यासाठी मोठी सूट देण्यात आली. शहरात गेल्या दोन दिवसांपासून वाहनखरेदी करण्यासाठी वितरकांच्या शो-रूमबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी आरटीओचे कामकाज रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू होते, तर शुक्रवारीदेखील हीच स्थिती होती.

या वाहनांच्या नोंदणीचा शेवटचा दिवस म्हणून परिवहन आयुक्तांनी शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत वाहन नोंदणीचे कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आरटीओची संपूर्ण यंत्रणा सकाळपासून याच कामात व्यस्त होती. वितरकांकडून ऑनलाइन नोंद केली जात होती, त्यास आरटीओकडून मंजुरी दिली जात होती. मात्र, यानंतरही वाहनांची नोंदणी झाली नाही, तर त्या वाहनांची नोंदणी दुसऱ्या दिवसापासून केली जाणार नाही, असे आजरी यांनी स्पष्ट केले.