इमेजमध्ये न अडकल्यानेच भूमिकांत वैविध्य - विद्या बालन

इमेजमध्ये न अडकल्यानेच भूमिकांत वैविध्य - विद्या बालन

पुणे - '‘मी स्वतःला कधीही एका इमेजमध्ये बांधून ठेवले नाही व त्यामुळेच मला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मिळतात. माझ्या आगामी ‘बेगम जान’मधील भूमिका एका शक्तिशाली महिलेची असून, अशी महिला मी पडद्यावर किंवा प्रत्यक्ष आयुष्यातही पाहिलेली नाही. अनेक छटा असल्यानेच मी ही भूमिका स्वीकारली,’’ असे प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ‘बेगम जान’बरोबरच आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल तिने दिलखुलास गप्पा मारल्या.

या विषयावर बंगालीमध्ये ‘राजकहिनी’ हा चित्रपट येऊन गेलेला असताना त्याच्या हिंदी रीमेकमध्ये भूमिका का करावी वाटली या प्रश्‍नावर ती म्हणाली, ‘‘मला अभिजात सिनेमांचे रीमेक व्हावेत, असे वाटते. बंगाली व हिंदी सिनेमाच्या कथेत साम्य असले तरी, घडत असलेला परिसर व पात्रांची मांडणी वेगळी आहे. दिग्दर्शक श्रिजित मुखर्जी यांनी ही कथा नव्याने मांडली असल्याने माझे काम सोपे झाले. अतिशय धडाडीने वागणाऱ्या बेगम जानच्या भूमिकेला अनेक पैलू असल्याने ती मला अधिक भावली. खरेतर मला ‘शोले’तील गब्बरसिंगसारखी भूमिका साकारण्याची इच्छा होती आणि ती काही अंशी ‘बेगम जान’मुळे पूर्ण झाली आहे.’’

विद्याला सध्याच्या ‘झीरो फिगर’ ट्रेंडबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘आपल्या देशात सांस्कृतिक विविधतेबरोबर दिसण्यातही विविधता आहे. प्रत्येकाचे शरीर वेगळे दिसते व आपण त्याचा आदर केला पाहिजे. मी सुरवातीला स्वतःची फिगर बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र आता मला मी आहे तशीच आवडते.’’ खान मंडळींबरोबर काम न करण्याची कारणे, स्वतःची ‘हीरो’ ही इमेज व त्यासाठी घेतलेले कष्ट, बंगाली दिसणे, गुलजार यांच्या गीतांवरील प्रेम, अमिताभ बच्चन व नसिरुद्दीन शाह या दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम करण्याचा अनुभव आदी प्रश्‍नांवर तिने मनमोकळी उत्तरे दिली. ‘एक अलबेला’नंतरही मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे व चांगली कथा मिळाल्यास मी पुन्हा मराठीत नक्की दिसेल, असेही तिने स्पष्ट केले. 
 

‘स्वच्छ भारत’ उत्कृष्ट योजना
‘‘भारत सरकारची स्वच्छ भारत ही उत्कृष्ट असून, मला स्वतःला स्वच्छतेची खूप आवड असल्याने मी त्याची ब्रॅंड ॲम्बेसिडर झाले. उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागात फिरताना स्वच्छतागृह नसल्याने आमच्या युनिटचे खूप हाल झाले होते व त्याच वेळी मला ही ऑफर आल्याने मी ती स्वीकारली. सरकारने टीव्ही, रेडिओसह सर्वच माध्यमांतून योजनेचा चांगला प्रचार केल्याने तिला चांगले यश मिळत आहे. भविष्यातही अशा योजनांत सहभागी व्हायला मला आवडेल,’’ अशा माहिती विद्या बालनने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com