लग्नास नकार दिल्याने प्रियकराच्या लग्नाचा मांडव पेटविला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

पुणे - लग्नास नकार दिल्यामुळे प्रेयसीने रागाच्या भरात प्रियकराच्या लग्नाचा मांडव पेटवून दिल्याची घटना बुधवारी घडली. हा प्रकार कात्रज परिसरातील शनिनगर भागात उघडकीस आला. या घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेस भारती विद्यापीठ पोलिसांनी गुरुवारी अटक केली. 

पुणे - लग्नास नकार दिल्यामुळे प्रेयसीने रागाच्या भरात प्रियकराच्या लग्नाचा मांडव पेटवून दिल्याची घटना बुधवारी घडली. हा प्रकार कात्रज परिसरातील शनिनगर भागात उघडकीस आला. या घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेस भारती विद्यापीठ पोलिसांनी गुरुवारी अटक केली. 

वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिनगर भागात दीपक हरिभाऊ रेणुसे (वय 32) या तरुणाचे शुक्रवारी (ता. 19) लग्न होते. लग्नाची धामधूम सुरू होती. घरासमोर लग्नाचा मांडव घालण्यात आला होता. दरम्यान, या तरुणाचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्याने लग्नाला नकार दिल्यामुळे आणि तो दुसऱ्या मुलीशी लग्न करीत असल्याचा राग मनात धरून या महिलेने त्याची दुचाकी जाळली. तसेच, तिने दुसऱ्या दिवशी लग्नाच्या मांडवावर रॉकेलचे पेटते बोळे टाकले. परंतु, तेथील नागरिकांनी लगेचच आग आटोक्‍यात आणली. त्या वेळी ही आग या महिलेनेच लावली, हे कोणाच्या लक्षात आले नव्हते. 

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान ही आग सुषमा गणपत टेमघरे (वय 36, रा. शनिनगर) या महिलेने लावल्याची माहिती पोलिस कर्मचारी अमोल पवार आणि कुंदन शिंदे यांना मिळाली. त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला आढळून आली. तसेच, या तरुणाने तिच्यावर संशय व्यक्‍त केला. तिचा शोध घेतला असता, ती दत्तनगर भागात असून, पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, तिने रागाच्या भरात मांडवाला आग लावल्याची कबुली दिली. 

पोलिस उपायुक्‍त प्रवीण मुंडे आणि सहायक आयुक्‍त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार वाघचवरे, उपनिरीक्षक समाधान कदम, कर्मचारी महेश मंडलिक, अरुण मोहिते, उज्ज्वल मोकाशी, सरफराज देशमुख, गणेश चिंचकर, राणी शिंदे यांनी ही कारवाई केली. 

सहा वर्षांपासून प्रेमसंबंध 
दीपक रेणुसे हा फॅब्रिकेशनच्या दुकानात कामाला आहे. तर, ही महिला स्क्रीन प्रिंटिंगच्या व्यवसायात आहे. ते दोघे शनिनगर भागात जवळच राहतात. या महिलेचे लग्न झाले असून, ती घटस्फोटीत आहे. गेल्या सहा वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. तिने दीपकला 50 हजार रुपयांची दुचाकी विकत घेऊन दिली होती. दरम्यान, मुलाच्या आई-वडिलांनी त्याचे एका मुलीसोबत लग्न ठरविले. त्यानंतर लग्नपत्रिका छापण्यात आल्या. ही लग्नपत्रिका महिलेच्या हातात पडली. तिने रागाच्या भरात दुचाकी आणि लग्नाचा मांडव पेटवून दिला, असे वरिष्ठ निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.