स्वतःच्याच मिळकतीचे १२ कोटी थकीत

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे - मिळकतकर वसुलीसाठी सर्वसामान्यांच्या घरासमोर बॅंड वाजविणाऱ्या प्रशासनाकडून महापालिकेच्या भाडेतत्त्वावर दिलेल्या मिळकतींचे सुमारे १२ कोटी रुपयांचे भाडे वसूल झालेले नाही. विकासकामांसाठी निधी अपुरा पडत असल्याचा दावा करणारे प्रशासन हे भाडे वसूल करणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

वाकडेवाडी येथील नगरसेविका सोनाली लांडगे यांनी या संदर्भात विचारलेल्या लेखी प्रश्‍नाला महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने दिलेल्या उत्तरातून ही धक्कादायक माहिती समोर आली. 

भाडेकरार संपलेल्या १८१ मिळकती असून, त्यापैकी एकही मिळकत महापालिकेच्या ताब्यात नाही. नवीन भाडे करारही केला गेला नाही, असे समोर आले आहे. महापालिकेने २९६ गाळे बांधले असून, ते सर्व भाडेतत्त्वावर दिले आहेत. भाडे करार संपल्यानंतर गाळे, दुकाने महापालिकेला परत ताब्यात न देणाऱ्यांकडून भाडे वसूल केले जाते, असा दावा प्रशासनाने उत्तराला देताना केला आहे. आत्तापर्यंत या मिळकतींचे सुमारे १२ कोटी ७ लाख ४८ हजार रुपये भाडे थकले आहे. याबाबत नगरसेविका लांडगे म्हणाल्या, ‘‘महापालिका प्रशासन महसूल वाढविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. 

भाडे करार संपल्यानंतरही मिळकती ताब्यात घेतल्या जात नाहीत. नवीन भाडे करार केला जात नाही हे गंभीर आहे. अनेक मिळकती या संबंधित भाडेकरूने दुसऱ्या व्यक्तीला भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. त्याच्याकडून जास्त दराने भाडे वसूल करून या व्यक्ती पैसा मिळवीत आहे आणि महापालिकेचे भाडे भरत नाही. भाडेवसुली का होत नाही, याची जबाबदारी निश्‍चित होणे आवश्‍यक आहे.’’

जागा बळकावल्याचा आरोप 
हे करार जुने आहेत. त्यानुसार जुन्या करारानुसार भाडे कमी असूनही थकबाकी शिल्लक आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या आणि काही राजकीय व्यक्तींनी या जागा बळकावल्याचा आरोप सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहेत. चालू बाजारभावाप्रमाणे भाडे वसूल केल्यास महसूल वाढू शकतो, असा दावाही वेलणकर यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com