उजनी धरण अद्याप उणे पातळीत

भीमानगर (जि. सोलापूर) - उजनी धरणातील सध्याचा पाणीसाठा.
भीमानगर (जि. सोलापूर) - उजनी धरणातील सध्याचा पाणीसाठा.

इंदापूर - पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाल्यानंतरही पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यास वरदायिनी ठरलेले उजनी धरण अद्याप उणे पातळीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. धरणात सध्या वजा १६.३२ टक्के साठा असून, उपयुक्त पातळीत येण्यासाठी आणखी साडेआठ टीएमसी पाण्याची गरज आहे. उपरोक्त तिन्ही जिल्ह्यांतील उजनी धरण पाणलोट क्षेत्रात सुमारे ५० सहकारी व खासगी साखर कारखाने आहेत. त्यामुळे उभ्या उसासदेखील पाणी कमी पडणार असल्याने साखर उतारा कमी मिळण्याची शक्‍यता आहे.

उजनी धरण कार्यक्षेत्रात जून महिन्यात १८२ तर जुलै महिन्यात फक्त २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्याच्या भीमा खोऱ्यातील १४ धरणात सरासरी ३१ टक्के पाणीसाठा आहे. ती धरणे ९० टक्के भरल्यानंतर उजनीत पाणी येण्यास सुरवात होते. गेल्या दीड महिन्यात पवना धरणावर ११८०, मुळशी धरणावर १०६१, टेमघर धरणावर ६८४, पानशेत धरणावर ६०६, वरसगाव धरणावर ६२६, वडिवळे धरणावर ९५५, भामा धरणावर ३५४, कलमोडी धरणावर ५३१, चासकमान धरणावर २७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

मागील वर्षी उजनी धरण शंभर टक्के भरल्याने उजनी धरण पाणलोट क्षेत्रात गतवर्षी ऊस व फळबाग लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असून त्यास पाण्याची नितांत गरज आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी असून उपयुक्त पातळी ५३ टीएमसी आहे. धरणातील सध्याची पाणी पातळी ४८९.६९५ मीटर आहे. मागील दीड महिन्यात १७ टक्के म्हणजे नऊ टीएमसी पाणी वाढले असले तरी ते पुरेसे नाही. गतवर्षी उजनी धरण शंभर टक्के भरल्यानंतर पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यामुळे पाणी भराभर सोडण्यात आले. त्यामुळे यंदा धरण भरल्यानंतर उजनीच्या पाण्याचे पारदर्शी नियोजन करणे तसेच धरणासाठी सर्वाधिक त्याग केलेल्या इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मूळ सिंचन आराखड्याप्रमाणे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी उजनी धरणग्रस्त अंकुश पाडुळे, अरविंद जगताप, मुकुंद शहा, महारुद्र पाटील, बाळासाहेब मोरे, कुबेर पवार, कालिदास देवकर, किसन जावळे, सुभाष काळे, प्रशांत सूर्यवंशी, धनाजी गोळे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com