भारत शेतीमध्ये सुपरपॉवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

बारामती - भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील सुपरपॉवर आहे आणि नेदरलॅंड हा उच्च गुणवत्तेच्या शेती उत्पादनाचा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. हे दोन्ही देश तंत्र आणि ज्ञानाच्या बाबतीत एकत्र येत असल्याने भविष्यातील जागतिक अन्नसुरक्षेचे आव्हान नक्कीच पेलतील, असे मत नेदरलॅंडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन यांनी शारदानगर (बारामती) येथे व्यक्त केले.

बारामती - भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील सुपरपॉवर आहे आणि नेदरलॅंड हा उच्च गुणवत्तेच्या शेती उत्पादनाचा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. हे दोन्ही देश तंत्र आणि ज्ञानाच्या बाबतीत एकत्र येत असल्याने भविष्यातील जागतिक अन्नसुरक्षेचे आव्हान नक्कीच पेलतील, असे मत नेदरलॅंडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन यांनी शारदानगर (बारामती) येथे व्यक्त केले.

राष्ट्रीय कृषी विकास योजना, राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या मान्यतेने येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट देशातील पहिला पशुधन अनुवंश सुधारणा उच्च गुणवत्ता केंद्र प्रकल्प उभारणार आहे. त्याचे भूमिपूजन स्काऊटेन यांच्या हस्ते माळेगाव येथे झाले. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, रणजित पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, हिरो कंपनीचे प्रमुख पंकज मुंजाळ, आयुक्त कांतिलाल उमाप, नेदरलॅंडच्या डी. कार्डोझो, एम. सोरेमा, व्हाऊटर वरे, रिक इवाग जगदीश भट्टर आदी उपस्थित होते. 

स्काऊटेन म्हणाल्या, ‘‘भारत व नेदरलॅंडमधील कृषी क्षेत्रातील हे परस्पर सामंजस्य पशुसंवर्धन क्षेत्रातील भविष्यातील आव्हाने दूर करण्यासाठी निश्‍चित उपयोगी पडेल. बारामतीत शेतीच्या बाबतीत अद्ययावत शैक्षणिक केंद्र आहे. शेतकऱ्यांना खूप चांगले व नवे तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न होतो हे कौतुकास्पद आहे. नेदरलॅंड व भारतातील तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीत शरद पवार यांनी मोलाचे योगदान दिले.’’ या वेळी खासदार सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.

डच तंत्रज्ञान बांधापर्यंत - शरद पवार
निर्यातीच्या बाबतीत उच्च गुणवत्तेचे डच तंत्रज्ञान आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचेल. यापुढील काळात केवळ शेतमाल पिकवून चालणार नाही, तर निर्यातीपर्यंतची धोरणे आखावी लागतील. तसे काम नेदरलॅंडमध्ये झाले, जे आता भारतात होऊ शकेल. आज दुधाच्या क्षेत्रात आव्हाने खूप आहेत. दूधदराचा प्रश्न केंद्र व राज्य सरकारपुढे आपण मांडूच, मात्र जनावरांची दुधाची क्षमता वाढविण्याचे तंत्र उत्पादकांना शिकवावे लागेल, असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.

Web Title: india superpower in agriculture