'बौद्धिक संपदा हक्का'साठी मोबाईल ऍप - पी. पी. चौधरी

'बौद्धिक संपदा हक्का'साठी मोबाईल ऍप - पी. पी. चौधरी

पुणे - 'मोबाईल ऍपमुळे बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) सेवा थेट वापरकर्त्यांच्या हातातच येणार आहे. देशभरातील मोबाईल फोन्सचा वापर विलक्षण वेगाने वाढत आहे. "आयपीआर'च्या फायद्यापासून आतापर्यंत अनभिज्ञ असलेल्यांना असे मोबाईल ऍप नक्कीच फायद्याचे ठरेल,'' असे मत कायदा व न्याय आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स तसेच माहिती तंत्रज्ञान खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी व्यक्त केले.

प्रगत संगणक विकास केंद्रातर्फे (सी-डॅक) विकसित करण्यात आलेल्या "मोबाईल आयपी' ऍप आणि "ई-रिसेप्शन' या टॅब्लेट आधारित मोबाईल रिसेप्शन डेस्क सेवेचे उद्‌घाटन शनिवारी झाले. तसेच सी-डॅकच्या इनोव्हेशन पार्कच्या आवारातील नवीन वास्तूचे उद्‌घाटन चौधरी यांनी केले.

कार्यक्रमाला सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मुना, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी; तसेच अन्य वरिष्ठ सदस्य उपस्थित होते. सी-डॅकच्या नवीन वास्तूमध्ये वर्गखोल्या आणि माहिती-तंत्रज्ञानासंबंधीच्या अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत. त्यातून सी-डॅकचे विविध प्रशिक्षण कार्यक्रम चालवले जाणार आहेत. बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन सी-डॅकने "इंटरनेट ऑफ थिंग्ज' आणि "हाय परफॉर्मन्स काम्प्युटिंग' पदव्युत्तर पदविका देणारे दोन नवीन अभ्यासक्रमही सुरू केले आहेत.

चौधरी यांनी उद्‌घाटन केलेले मोबाईल ऍप हे "पेटंट ऍनॅलिसिस मॅनेजमेंट सिस्टिम'चा भाग आहेत. आपल्या देशातील बौद्धिक साधनसंपत्तीला योग्य ते संरक्षण पुरवणे हा या कार्यपद्धतीचा उद्देश आहे.

चौधरी म्हणाले, 'संशोधन आणि नवनिर्माणाची परंपरा आणि योग्य मूल्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांमध्ये रुजवल्याने नवकल्पनांचा चिरंतन ध्यास निर्माण करता येईल. हे प्रशिक्षणार्थी नवनिर्मितीची ज्योत देशात आणि देशाबाहेरही चेतवून सी-डॅकचे नाव उज्ज्वल करतील.''

प्रा. मुना म्हणाले, 'नागरिक आणि सेवासुविधांची सांगड या ऍपच्या माध्यमातून घातली जात आहे. बौद्धिक संपदा (आयपी) निर्मितीच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्याची आम्हाला आशा आहे.''

डॉ. दरबारी म्हणाले, 'आपण सतत विकास पावणाऱ्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाची आव्हाने स्वीकारण्याचा आत्मविश्वास आपल्या प्रशिक्षणार्थींमध्ये जागवला पाहिजे.''

ऍपद्वारे मिळणार विविध सेवा
ऍपच्या वापरकर्त्यांना बौद्धिक हक्कांसंबंधित विविध सेवा आपल्या मोबाईलमधून मिळवणे शक्‍य होणार आहे. त्यासाठी मोबाईलमध्ये ऍप डाउनलोड करावे लागेल. "आयपीआर'बाबतच्या ताज्या बातम्या, न्यूज ऍलर्ट, घडामोडी समजण्याकरता इव्हेंट अलर्ट, प्राथमिक शंका व प्रश्न विचारण्यासाठी "रिलेटेड क्वेरी', नोंदणीकृत सदस्यांना पेटंट अलर्ट, नोटिफिकेशन्स या ऍपमार्फत वापरकर्त्यांना मिळणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com