कवी, लेखकांनी मत्सर बाळगू नये - कोत्तापल्ले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

पुणे - 'उर्दू गझलांच्या मुशायऱ्यांमध्ये वातावरण उत्फुल्ल असते. त्या गझलांना दाद मिळते. मराठी श्रोता मात्र ढिम्म असतो. हसू की नको, दाद देऊ की नको, असा विचार तो करत असतो, हे चित्र बदलायला हवे.

याबरोबरच कवी, लेखकांनी एकमेकांबद्दल मत्सर बाळगू नये,'' असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.

पुणे - 'उर्दू गझलांच्या मुशायऱ्यांमध्ये वातावरण उत्फुल्ल असते. त्या गझलांना दाद मिळते. मराठी श्रोता मात्र ढिम्म असतो. हसू की नको, दाद देऊ की नको, असा विचार तो करत असतो, हे चित्र बदलायला हवे.

याबरोबरच कवी, लेखकांनी एकमेकांबद्दल मत्सर बाळगू नये,'' असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे आयोजित "मराठी गझलेचा जागतिक संचार' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप आज झाला. त्या वेळी डॉ. कोत्तापल्ले बोलत होते. मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

विद्यापीठातील मराठी विभागाच्या 70 वर्षांच्या इतिहासात गझलांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक एकत्र येण्याची पहिलीच घटना आहे, असे सांगत डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ""चांगले गाणे लिहिण्याचे सामर्थ्य फार कमी लोकांकडे असते. त्या गाण्यांना आपण फार महत्त्व देत नाही. गझलेचेही तसेच झाले आहे. तिच्यातील सामर्थ्यदेखील कमी लोकांनी ओळखले आहे.''

लेखक, कवी परस्परांचा मत्सर करतात; परंतु द्वेष आणि मत्सर असू नये. माणसाबद्दल नितांत प्रेम असलेल्या आणि मत्सर, धर्म, जात गौण मानणारा निखळ माणूसच गझल लिहू शकतो. गझलेचे नाते सादरीकरणाशी आहे. त्यामुळे कवीला संगीताची जाण असलीच पाहिजे, असेही कोत्तापल्ले यांनी सांगितले.

डॉ. सांगोलेकर म्हणाले, ""मराठी गझल प्रांतात बरेच गटतट झाले आहेत. ते असावेत; पण गटबाजी नको. तेच या चर्चासत्राच्या माध्यमातून संपविण्याचा प्रयत्न केला आहे.''

पैसे का मिळत नाहीत, विचार करा!
चर्चासत्राच्या समारोपावेळी मुंबईतील गझलरसिक महिलेने गझलेच्या प्रसारासाठी पाच हजार रुपयांचा मदतनिधी दिला. त्यावर, ""एकीकडे मागूनही पैसे मिळत नाही, इथे मात्र लोक आणून देतात,'' अशी टिप्पणी एका वक्‍त्याने केली. डॉ. कोत्तापल्ले यांनी त्याचा संदर्भ भाषणात दिला; परंतु साहित्य संमेलनाच्या निधीमधील वाढीच्या मागणीचा उल्लेख टाळत ते म्हणाले, ""लोकांकडे पैसे मागूनही मिळत नसतील, तर ते का मिळत नाहीत, याचा विचारही आपण केला पाहिजे.''