पुणे विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडासंकुल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मैदानी खेळांसाठी क्रीडांगण, शूटिंग रेंज आणि धावपटूंसाठी 400 मीटर लांबीचा "ट्रॅक'

मैदानी खेळांसाठी क्रीडांगण, शूटिंग रेंज आणि धावपटूंसाठी 400 मीटर लांबीचा "ट्रॅक'
पुणे - बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, टेबल टेनिस यांसारख्या खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे इनडोअर स्टेडियम, मैदानी खेळांसाठी क्रीडांगण, शूटिंग रेंज आणि धावपटूंसाठी 400 मीटर लांबीचा "ट्रॅक' (धावणमार्ग) याबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सुसज्ज असे क्रिकेटचे मैदान तयार करणार आहे.

विद्यापीठालगतच्या 27 एकरांत हे क्रीडासंकुल साकारत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निधीमध्ये विद्यापीठाने भर घालून इनडोअर स्टेडियम, 25 मीटर शूटिंग रेंजचे काम सुरू केले आहे. तसेच, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाकडून (रुसा) मिळालेल्या पाच कोटींच्या निधीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचा 400 मीटरचा सिंथेटिक "ट्रॅक' तयार करण्यात येत आहे. त्याच्या आतमधील मैदानात फुटबॉलचे मैदान तयार केले जाणार आहे. फुटबॉल व्यतिरिक्त थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक आदी क्रीडा प्रकार तिथे होणार आहेत.

क्रीडा संकुलात मोठा प्रकल्प हा क्रिकेटच्या मैदानाचा आहे. येत्या दोन वर्षांत तो पूर्ण करणार आहेत. एकूण 63 मीटर व्यासाचे हे मैदान असेल. दिवसा आणि रात्री सामने खेळता येतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्यालगत विद्यापीठाचे अतिथी निवास बांधणार आहे. एकत्रित क्रीडा संकुलासाठी पार्किंग आणि आगविरोधी यंत्रणेची स्वतंत्र व्यवस्था असेल.

याबाबत विद्यापीठाच्या स्थावर विभागाचे अभियंता आर. व्ही. पाटील म्हणाले, 'विद्यापीठात क्रिकेटचे मैदान असले, तरी प्रेक्षकांना बैठक व्यवस्था नाही. या संकुलात चांगल्या दर्जाचे क्रिकेट मैदानही असेल. विद्यापीठ आणि आंतरविद्यापीठीय स्पर्धा तिथे भरविता येतील. राष्ट्रीय स्तरावर सामन्यांसाठी जाणाऱ्या खेळांडूना सराव करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलांप्रमाणेच या संकुलात सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.''

पूर्वी पारंपरिक म्हणून खेळले जाणारे क्रीडाप्रकार आता करिअर म्हणून जोपासले जाऊ लागले आहेत. त्या दृष्टीने मुलांना योग्य मार्गदर्शन आणि सरावांसाठी विद्यापीठ क्रीडा संकुल विकसित करीत आहे. विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण एकाच ठिकाण करता यावे, तसेच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या होतकरू आणि गरजू मुलांना संधी मिळवून देण्यासाठी या संकुलाचा चांगला उपयोग होईल.
- डॉ. दीपक माने, क्रीडा संचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ