इंटरनेट परिणामकारकपणे हाताळता येणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

सिंहगड संस्थेत देशातील पहिली सॉफ्टवेअर डिफाइन नेटवर्क लॅब

सिंहगड संस्थेत देशातील पहिली सॉफ्टवेअर डिफाइन नेटवर्क लॅब
पुणे - इंटरनेट असो वा लोकल एरिया नेटवर्क (लॅन) त्याचा विस्तार आणि माहितीची परिणामकारकपणे हाताळणी करता येईल, अशी देशातील पहिली सॉफ्टवेअर डिफाइन नेटवर्क लॅब सिंहगड संस्थेच्या नऱ्हे येथील संगणक अभियांत्रिकी विभागात उभारण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच प्रशिक्षण मिळण्याबरोबर रोजगाराच्या संधीदेखील मिळू शकतील.

लंडन येथील इकोड नेटवर्क या कंपनीच्या मदतीने ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. त्याचे उद्‌घाटन "सकाळ'चे संचालक (तंत्रज्ञान) भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते नुकतेच झाले. प्राचार्य डॉ. एस. एन. माळी, "इकोड'चे मुख्य कार्यकारी अधिकारी निमित शिसोदिया, प्राध्यापक परिक्षित महल्ले आणि गीता नवले आदी या वेळी उपस्थित होते.

प्रयोगशाळेबद्दल माहिती सांगताना प्राध्यापक संतोष दराडे म्हणाले, ""सध्या लॅन असो की इंटरनेट त्यात बदल करायचा असेल, तर तुम्हाला "सिस्टिम ऍडमिन'वर अवलंबून राहावे लागते; परंतु "सॉफ्टवेअर डिफाइन नेटवर्क' प्रणालीमध्ये संगणक वापरणारा स्वत: स्क्रिप्टद्वारे सूचना देऊ शकतो. त्यानुसार एका ठिकाणी बसूनही इतर कोणत्याही शहरात वा कुठेही कंपनीचे नेटवर्क असेल, तर त्यात बदल करता येतील.''

विद्यार्थ्यांना फायदा
संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना विद्यार्थी आणि प्राध्यापकांना सॉफ्टवेअर डिफाइन नेटवर्क हे नवीन तंत्रज्ञान शिकायला मिळेल. त्यांना प्रशिक्षण मिळून कंपन्यांमध्ये नोकरी वा रोजगारांची संधी मिळेल. तसेच भारतीय संगणक अभियंत्यांना बाहेरच्या देशात जाऊन संघर्ष करावा लागतो; परंतु असे तंत्रज्ञान शिकल्यानंतर त्याला भारतातच रोजगाराची संधी उपलब्ध होतील,'' असे दराडे यांनी सांगितले.

भाऊसाहेब पाटील यांनी जगभरातील तरुणांनी निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती देत नव्या युगातील तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान निर्मितीमध्ये योगदान दिले पहिजे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

शिसोदिया म्हणाले, 'सॉफ्टवेअर डिफाइन नेटवर्कमुळे संगणक यंत्रणा हाताळण्यासाठी अनावश्‍यक मनुष्यबळ कमी लागण्याबरोबरच खर्चातही कपात होते. "बॅंडविड्‌थ' आणि नेटवर्कची लवचिकता वाढू शकते. माहितीचा साठाही याद्वारे परिणामकारकपणे हाताळता येतो.''

नऱ्हे - सिंहगड संस्थेतील प्रयोगशाळेच्या उद्‌घाटनावेळी (डावीकडून) प्रा. गीता नवले, डॉ. एस. एन. नवले, भाऊसाहेब पाटील, प्राध्यापक संतोष दराडे, निमित शिसोदिया, निहार रंजना.