"आयटी'तील महिलांना सुरक्षिततेची हमी मिळणार का? 

"आयटी'तील महिलांना सुरक्षिततेची हमी मिळणार का? 

आयटी अभियंता अंतरा दास या तरुणीचा एकतर्फी प्रेमातून खून झाला. त्यानंतर महिनाभरातच रसिला ओपी या अभियंता तरुणीचा सुरक्षारक्षकाने गळा आवळून खून केला. या घटनांमुळे आयटी क्षेत्रातील महिला कर्मचारी आणि त्यांच्या पालकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. यापुढील काळात पोलिस आणि आयटी कंपन्या महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची हमी देणार आहेत का, हा खरा प्रश्‍न आहे. 

तळवडे येथील कॅपजेमिनी आयटी कंपनीतील अभियंता अंतरा देबानंद दास हिचा एकतर्फी प्रेमातून खून झाला. अंतरा ही मूळ पश्‍चिम बंगालची. तिचा खून करणारा संतोष कुमार हा बंगळूर येथे आयटी कंपनीत कामाला होता. तो मूळचा बिहारच्या भोजपूर येथील. त्या दोघांमध्ये मैत्री होती. त्याने एकतर्फी प्रेमातून तिच्यावर वार केले. या गुन्ह्याचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. तोवर हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीतील अभियंता तरुणीचा खून झाला. 

आसाममधील भाबेन सैकिया या सुरक्षारक्षकाने केरळ राज्यातील रसिला ओपी हिचा केबलने गळा आवळून खून केला. 

अंतरा आणि रसिला या दोघींचेही वय चोविशीच्या आतच. अगदी तरुण वयात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. देहूरोड पोलिसांनी आरोपी संतोष कुमार याला बंगळूरमधून अटक केली. तसेच, रसिलाच्या खूनप्रकरणी आरोपी भाबेन सैकिया हाही आसाममध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली, ही बाब निश्‍चितच कौतुकास्पद आहे. मात्र, पुण्याच्या आयटी क्षेत्रात घडलेल्या या दोन घटनांमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. आयटी क्षेत्रात अशी एखादी घटना घडली, की काही दिवस महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्यावर चर्चा होते. पुन्हा परिस्थिती जैसे थे! पोलिस आयुक्‍तांनी आयटी कंपन्यांना आता नवी नियमावली लागू करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, यापूर्वीही पोलिसांनी आयटी कंपन्यांना नियमावली घालून दिली होती. त्या नियमांची कितपत अंमलबजावणी झाली? अशा घटना घडण्यामागे कोठे त्रुटी होत्या, हे पाहिल्यास भविष्यात अशा प्रकारच्या घटना टळतील. 

इन्फोसिस कंपनीने नेमलेली टेरियर सिक्‍युरिटी सर्व्हिसेस ही बंगळूर येथील आहे. या सिक्‍युरिटी एजन्सीने परवाना नूतनीकरण करून घेतलेला नव्हता. तसेच, त्यासाठी पुरेशी कागदपत्रेही दिलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडील सुरक्षारक्षक भाबेन सैकिया याच्यासह इतर कर्मचाऱ्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन झाले होते का, हेही तपासावे लागेल. रसिलाच्या खुनाच्या वेळी सुरक्षारक्षक एकटाच होता का? कंपनीत त्याशिवाय आणखी कोणी होते, ही बाब पोलिसांना दुर्लक्षित करून चालणार नाही. 

अंतरा दास हिला त्या तरुणाकडून धमकीचे फोन येत होते, अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली होती. रसिला ओपी हिने यापूर्वी वरिष्ठांकडून होत असलेल्या त्रासाबाबत वडिलांना कळविले होते. सुरक्षारक्षक सैकिया हा रसिलाकडे एकटक पाहत होता. त्यावर तुझी नोकरी घालवते, अशी तंबीही रसिलाने दिली होती. मात्र, दोघींनीही पोलिस ठाण्यात तक्रार केली नाही. त्यांनी तक्रार केली असती तर कदाचित दोघींचाही जीव वाचला असता, असेही बोलले जात आहे. महिलांनी अन्याय होत असेल तर तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार देणे गरजेचे आहे. एकदा पाठीशी घातल्यास समोरील व्यक्‍तीची हिंमत वाढते. त्यातून पुन्हा अशा घटना घडण्याची शक्‍यता असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com