मधुमेहासाठी जनुकांना दोष देणे चूक - शिंदे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

पुणे - ‘‘मधुमेहासाठी केवळ आपल्या जनुकांना दोष देण्यात अर्थ नाही. आहार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे या स्थितीत बदल करणे शक्‍य आहे. माझ्या आईला मधुमेह होता तरीही मी मधुमेहापासून दूर राहू शकलो हे मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगू शकतो,’’ असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. 

सेंट मिराज्‌ कॉलेजमध्ये ‘फिजिशियन्स कमिटी फॉर रिस्पॉन्सिबल मेडिसीन’ आणि ‘फ्रीडम फ्रॉम डायबेटिस’ यांनी आयोजिलेल्या ‘मधुमेहासंबंधी काळजी’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. ‘बिल्डिंग अ हेल्दी इंडिया’ या उपक्रमांतर्गत या सत्राचे आयोजन केले होते. डॉ. झिशान अली आणि डॉ. प्रमोद त्रिपाठी यांनी मधुमेहाशी झुंज, शाकाहार याविषयी माहिती दिली. 

डॉ. झिशान अली म्हणाले, ‘‘शाकाहारामुळे वजन आणि मेद कमी होण्यास, इन्शुलिनची संवेदनशीलता वाढण्यास आणि मधुमेह परतवून लावण्यास मदत होते. डेअरी आणि वनस्पती तेलविरहित, कमी चरबीच्या शाकाहाराचा अवलंब केला तर मधुमेहग्रस्त, कोलेस्ट्रॉलची पातळी, रक्‍तदाब आणि वजन कमी ठेवू शकतात, असे अनेक अभ्यासांवरून आढळून आले आहे. सर्वांत उत्तम म्हणजे, या आहारामुळे कॅलरी मोजणे, आहार कमी करणे किंवा कार्बोहायड्रेटस्‌ सोडून देणे याची आवश्‍यकता नसते.’’

डॉ. प्रमोद त्रिपाठी म्हणाले, ‘‘आपल्या मधुमेहाची स्थिती जाणून घेण्यासाठी फास्टिंग इन्शुलिन आणि एचएससीआरपी या दोन महत्त्वपूर्ण तपासण्या मधुमेहग्रस्तांनी करणे आवश्‍यक आहे. फ्रीडम फ्रॉम डायबेटीसमध्ये, मधुमेह परतवून लावण्यासाठी नैसर्गिक, शाकाहारी आहारपद्धती अवलंबिण्यासाठी रुग्णांना प्रोत्साहित केले जाते.’’ एक लाख मधुमेहींना उपयोगी पडतील अशा विविध उपक्रमांविषयी माहिती देऊन डॉ. रितू त्रिपाठी यांनी या कार्यक्रमाची सांगता केली.