जम्मू-काश्‍मीरला प्रवाहात आणण्याची गरज - जयराम रमेश

टिळक स्मारक मंदिर - ‘सरहद’तर्फे आयोजित काश्‍मीर महोत्सवाचे उद्‌घाटन करताना जयराम रमेश. या वेळी शैलेश पगारिया, रमेश, मेहमूद शाह, संजय नहार, मोहम्मद हसन मीर, शैलेश वाडेकर.
टिळक स्मारक मंदिर - ‘सरहद’तर्फे आयोजित काश्‍मीर महोत्सवाचे उद्‌घाटन करताना जयराम रमेश. या वेळी शैलेश पगारिया, रमेश, मेहमूद शाह, संजय नहार, मोहम्मद हसन मीर, शैलेश वाडेकर.

पुणे - ‘‘भारत हा जम्मू-काश्‍मीरशिवाय अपूर्ण आहे आणि जम्मू-काश्‍मीर हा भारताशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे आपण एकत्रित प्रयत्नांतून जम्मू-काश्‍मीरला भारताच्या मुख्य प्रवाहात आणलेच पाहिजे. तरच काश्‍मीरमध्ये पुन्हा शांतता नांदेल,’’ असे मत माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी शनिवारी व्यक्त केले.

सरहद संस्थेच्या वतीने आयोजित काश्‍मीर महोत्सवाचे उद्‌घाटन कांगडी (बांबूचा दिवा)मध्ये ऊद टाकून खास काश्‍मीर शैलीत जयराम रमेश यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘सकाळ’चे वृत्त संपादक माधव गोखले, जम्मू-काश्‍मीरमधील पर्यटन विभागाचे संचालक मेहमूद शाह, हॉर्टिकल्चर विभागाचे संचालक मोहम्मद हसन मीर, ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार, आयोजक शैलेश पगारिया, अतिश चोरडिया, शैलेश वाडेकर उपस्थित होते.

जयराम रमेश म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमधील वेगवेगळ्या सामाजिक कामांशी मी जोडला गेलेलो आहे. नापास मुलांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देणारी ‘उडान’ असेल किंवा महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकवणारी ‘उम्मीद’ असेल, अशा उपक्रमातून तेथे कार्यरत आहे.

खर तर अडचणीत असलेल्या लोकांसाठी धावून जाणे ही आपल्या प्रत्येकाची संवेधानिक जबाबदारी आहे.’’ शाह म्हणाले, ‘‘जेव्हा जम्मू-काश्‍मीरमधील वातावरण खराब होते तेव्हा भारतातील लोकांनाही तेवढेच दु:ख होते. याचा अर्थ आपण भावनिकदृष्ट्या एक आहोत. हे एकोपा टिकवून ठेवला पाहिजे.’’
दरम्यान, काश्‍मीरमधील आघाडीचे गायक शफी सोपोरी आणि गायिका शमीमा अख्तर यांनी काश्‍मिरी, हिंदी गाणी सादर करून तेथील संगीत परंपराच उलगडून दाखवली.

जम्मू-काश्‍मीरमधील वातावरण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. अशा स्थितीत तेथे सामाजिक काम करणे अत्यंत कठीण असते. ‘सरहद’ गेल्या अनेक वर्षांपासून हे शिवधनुष्य उचलत आहे. हे खरोखरच प्रेरणादायी आहे.
- जयराम रमेश, माजी केंद्रीय मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com