हिंदू घरातून निघाला "जनाजा' 

 shabira.gif
shabira.gif

शिरूर : तब्बल चाळीस वर्षांपूर्वी एका हिंदू कुटुंबाशी त्यांचा परिचय झाला. चहापान आणि जेवणखानातून लोभ वाढत गेला. मुस्लिम असूनही "वो लोग' त्यांना आपले वाटू लागले आणि त्या कुटुंबाचाच भाग झाल्या. आज वार्धक्‍यामुळे जगाचा निरोप घेताना त्यांचा "जनाजा' ही त्या हिंदू घरातूनच निघाला. शाबिरा दादामियॉं शेख (वय 80) यांच्या निधनानंतर आज जातिपातीची सर्व लक्तरे गळून पडली आणि हिंदू- मुस्लिमांनी एकत्र येत त्यांना जड अंतःकरणाने निरोप दिला. 

शिरूरचे माजी नगराध्यक्ष गुलाबशेठ धाडिवाल यांच्या घरातून त्यांचा जनाजा निघाला. त्या वेळी दोन्ही कुटुंबीयांबरोबरच हिंदू- मुस्लिम बांधव एकमेकांच्या गळ्यात पडून रडले. शाबिरा यांचा मुलगा रफीक हा धाडिवाल यांच्याकडे कामाला होता. त्यामुळे त्यांचाही धाडिवाल यांच्याशी परिचय झाला. घरी येण्याजाण्यातून वाढलेली ओळख, चहापान आणि जेवणखानातून आणखी घट्ट झाली. त्यातून त्या धाडिवाल यांच्या मुलांचे संगोपन करण्यापासून घरातील कामांतही सर्वतोपरी मदत करू लागल्या. कालांतराने त्या धाडिवाल कुटुंबातील एक सदस्यच झाल्या. दरम्यान, रफीक यांच्या अकाली निधनानंतर तर धाडिवाल कुटुंब हेच त्यांचे हक्काचे घर झाले. 

धाडिवाल यांनी दहा वर्षांपूर्वी आई ताराबाई यांचे निधन झाल्यानंतर शाबिरा यांनाच आई मानले. धाडिवाल कुटुंबातील मुला-मुलींच्या विवाह सोहळ्याचे नियोजन असो की घरकामांचा निपटारा, प्रवासाची तयारी असो की मुली- सुनेची बाळंतपणे. सर्व कामांचे नियोजन शाबिरा यांच्याकडेच निर्धास्तपणे सोपविले जाई. धाडिवाल कुटुंब धार्मिक विधीसाठी बाहेरगावी जात, तेव्हाही त्या हमखास त्यांच्यासोबत जायच्या. इतकेच नव्हे; तर धार्मिक विधीत समरसही व्हायच्या. 

मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला. आज सकाळी धाडिवाल यांच्या निवासस्थानापासून त्यांचा जनाजा काढण्यात आला. येथील कब्रस्तानमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी "मुस्लिम जमात'चे अध्यक्ष इक्‍बालभाई सौदागर, माजी नगराध्यक्ष नसीम खान, माजी उपनगराध्यक्ष संजय खांडरे, कॉंग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे शहर अध्यक्ष अजिम सय्यद आदी उपस्थित होते. गुलाबशेठ धाडिवाल यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले. 

"मेरा जनाजा यहीसे निकालो' 
शाबिरा यांना राजू हा मुलगा असून, तो गॅरेज काम करतो. शिवाय तीन विवाहित मुली आहेत. त्यांना भेटायलाही त्या जात, पण परतून 
पुन्हा धाडिवाल कुटुंबातच येत. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. धाडिवाल यांच्या घरीच त्यांची शुश्रूषा चालू होती. त्या वेळी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक भेटायला आल्यानंतर, "मेरा जनाजा यहीसे निकालो' असे त्या आवर्जून सांगत. 
sur04p01 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com