युरोप नव्हे; हे तर पुणे!

युरोप नव्हे; हे तर पुणे!

पुणे - तुम्ही वृद्ध असाल...तरुण असाल...आपल्या आई-बाबांसोबत फेरफटका मारायला आलेले छोटुकले असाल किंवा अजून कुणी असाल, तरी तुमच्यासाठी इथे जागा आहे. हो, अगदी भरपूर. तुम्ही या, बसा, खूप वेळ टाइमपास करा, स्मार्ट फोनवर सर्फिंग करा, पुस्तकंही वाचा किंवा अगदी नुसतंच बसून राहा... ही युरोपमधील कल्पना आता पुणेकरांसाठी जंगली महाराज रस्त्यावर अवतरली आहे.   

पूर्वी रस्त्यात येणारी हिरवीगार सावली देणारी झाडं आता रस्त्यात राहिली नाहीत. कडेला झाली आहेत. आता त्या झाडांखाली मस्तपैकी बसताही येतंय. एखाद्या बागेत जसं मनमोकळं वातावरण असणं अपेक्षित असतं (आणि पुण्यातल्या अनेक बागांत ते ‘मिसिंग’ असतं) असं वातावरण चक्कं या रहदारीच्या रस्त्यावर दिसू लागलंय...

शहरी असा शब्द म्हणण्यापेक्षा ‘नागरी’ असा खास ग्रीकांकडून उधार घेतलेला शब्द वापरण्याची इच्छा व्हावी, असा हा देखणा आराखडा सध्या जंगली महाराज रस्त्यावर पाहायला मिळतोय. ‘रस्ते माणसांसाठी की वाहनांसाठी’ या प्रश्नाचं उत्तर गेली अनेक वर्षं वाहनांनी ‘हायजॅक’ केलं होतं, पण आता त्यात पुन्हा एकवार माणसांनी शिरकाव केलाय... जे खूपच छान असल्याचं या रस्त्यावरच्या रचनेतून दिसून येतंय, असं अनेक जणांचं म्हणणंय. पुणे महापालिकेने अंगीकारलेल्या ‘अर्बन स्ट्रीट डिझाइन गाइडलाइन्स’ अंतर्गत या रस्त्याचं हे बदललेलं रूपडं पाहायला मिळतंय.

जेव्हा लोकं म्हणतात ‘वाह’!
इथल्या कमानीमधून नुसतेच चालत जा. बाकांवर बसा. एकमेकांशी समोरासमोर बसून बोला, पाठ टेकून बोला. वाटलं तर नुसते मॉर्निंग/इव्हनिंग वॉक आणि शतपावलीही करा... सेल्फी काढा ! शहरात मोकळा श्‍वास घ्यायला आहे कुठे जागा? या प्रश्नाचं उत्तर आता जंगली महाराज रस्ता आहे. इंग्रजांच्या काळात बांधला गेलेला हा सुबक रस्ता पुन्हा एकवार आपल्या देखण्या दिवसांत गेल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे त्याचं हे नवं रूपडं आता युरोपीय धाटणीत सजू पाहतंय. सुटसुटीत बसथांबा, फूलझाडं, देखणे दिवे, दुतर्फा लावलेली नवी रोपं आणि त्यासाठी खास पाण्याची सोय, रस्त्यात येणारी झाडं न कापता तशीच ठेवून, त्यांच्या बाजूने वळसा घालून जाणारा रस्ता... हे सारं पाहून अनेक जण आपसूकपणे ‘वाह ! क्‍या बात है !’ अशी दाद देऊन जाताहेत. 
 

रस्ते म्हणजे एवढं सारं काही हवं! 
पदपथ
सायकल ट्रॅक
बसथांबे
बससाठीची वेगळी लेन
पार्किंगची व्यवस्था
रस्ते ओलांडण्याची सुरक्षित जागा
गतिरोधक
वृक्षारोपण
पाण्याची सुविधा
कचऱ्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृह

अर्बन स्ट्रीट गाइडलाइन 
राष्ट्रीय नागरी परिवहन धोरण आणि सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसार पुण्यातील रस्त्यांचे योग्य नियोजन करण्याचा हा आराखडा आहे. त्यानुसार रस्त्यांचे पुनर्विकसन करण्यात येत आहे. या संपूर्ण योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे, ते पादचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देणे. हेच उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून ‘आधी पादचारी, त्यांना पुरेशी जागा आणि त्यानंतर वाहने’ या प्राधान्यानुसार रस्त्यांची रचना नव्याने केली जात आहे.

ही आहेत या आराखड्याची वैशिष्ट्ये  
रस्त्यांवर नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी, या दृष्टीने रस्त्यांची रचना असावी
वाहतुकीच्या विविध पर्यायांपर्यंत पोचण्यासाठी विनात्रास सुविधा उपलब्ध करून देणारी मोकळी जागा रस्त्यांवर असावी
रस्त्यांवर पादचाऱ्यांना स्वतःची म्हणून एक स्वतंत्र जागा असायला हवी
रस्त्यांवरच लोक, वाहने, चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली वाहने, विक्रेत्यांच्या गाड्या आणि अतिक्रमण करून लावलेली दुकाने, मध्येच असणारी कचरापेटी हे सध्याचे चित्र बदलणे अपेक्षित
दुचाकी-चारचाकी वाहने, बस, सायकल, पादचारी आणि रस्त्यांचा वापर करणाऱ्या प्रत्येकासाठी आवश्‍यकतेनुसार पुरेशा जागेची उपलब्धता करून देणे
पुण्यातील विविध रस्त्यांवर अशा पद्धतीनेच पुनर्विकास केला जाणार
पुनर्विकास हा पर्यावरणपूरकतेला धरूनच अपेक्षित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com