चड्डी आणि हाती काठी घेऊन 'आयएसआय'शी कसे लढणार: कन्हैया

Kanhaiya Kumar
Kanhaiya Kumar

पुणे -  ''भारत हा 'राज्यांचा संघ' आहे, हे आम्ही ऐकून होतो. पण सध्या अचानक हा 'नागपूरचा संघ' कसाकाय मोठा झाला ?... या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावंच लागेल. ज्या भूमीत आंबेडकर जन्मले त्याच भूमीत हिंदुत्ववादी सावरकर सुद्धा जन्मतात, हेच मोठं गमतीशीर आहे. मात्र, लोकशाहीधिष्ठित आणि संवैधानिक राष्ट्र हे आंबेडकरांच्या आधारे बनवायचे की सावरकरांच्या आधारे, हे आता आपणच ठरवायचे आहे," अशा शब्दांत जवाहरलाल विद्यापीठातील (दिल्ली) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार याने हिंदुत्ववादी विचारांवर तोफ डागली.

पुण्यातील वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रमात 'संविधान की संघ' या विषयावर कन्हैय्या बोलत होता. या वेळी तेहसीन पुनावाला, जिग्नेश मेवानी, शेहला रशीद हेही उपस्थित होते.

कन्हैय्या म्हणाला, "लोकांनी शिकावे हेच मुळी या हिंदुत्ववादी सरकारला वाटत नाही. लोक शिकले की ते प्रश्न विचारतील आणि यांना तेच नको आहे. आपला भवताल हळूहळू भगवा होत जाणे, हे मोठ्या शिताफीने घडत चालले आहे. पण प्रश्न विचारावेच लागतील. मग भले ते आमच्यावर देशद्रोहाचा खटला पुन्हा चालवू देत. आम्ही लढू आणि जिंकू देखील..."

'मोदी चालीसा' लिहिणाऱ्यांना आज महत्त्वाची पदे दिली जात आहेत. चड्डी परिधान करून देशाचे भगवीकरण केले जात आहे. मला प्रश्न पडतो की हे चड्डी आणि हाती काठी घेऊन 'आयएसआय'शी कसे लढणार आहेत? स्वतः अर्धी चड्डी घालणारे महिलांच्या डोक्यावरचा पदर का ढळू देत नाहीत?... असे सवालही त्याने उपस्थित केले.

शेहला म्हणाली, "आपली घटना ही मुळात रुढीवादाचा विरोध करते. पण हिंदुत्ववादी त्याचाच पुरस्कार करतात. नुकतेच वेंकय्या नायडू यांनी 'आझादी' शब्दावर बंदी आणण्याचे वक्तव्य केले होते. मला विचारायचे आहे- 'आझादी' शब्दावर बंदी आणणार तर मग घटनेतील फ्रीडम शब्दाचे काय कराल ? 33 टक्के राखीव जागा महिलांना देण्याबद्दल बोला ना मोदीजी..."

कन्हैय्या म्हणाला :

  • शबरीची बोरं ज्यांनी उष्टी खाल्ली त्या रामाचे मंदिर बनवणार की केवळ हिंदुत्वाचे फोल प्रतीक असणाऱ्या रामाचे ? यांच्या मनात नव्हे, हत्यारांत राम आहे.
  • देशद्रोहाच्या एकाच खटल्यात मी हिंदू आणि उमर खालिद मुसलमान होता. पण,केवळ मुस्लिम असल्याने उमरला अधिक त्रास भोगावा लागला.
  • भारतात म्हणे पुष्पक विमानं बनायची त्याच प्राचीन काळात चक्क 'आयफोन' सुद्धा तयार केले जायचे !
  • आता मोदी म्हणजे धोनी आणि योगी म्हणजे विराट कोहली. आता मोदींनी आपली भूमिका बदलली आहे. त्यांना आता नेहरूंच्या नंतरचे 'शांतिदूत' बनायचे आहे म्हणे !
  • संघ हे परिवार नाही, तो आहे जातीयवाद्यांचा अड्डा
  • मोदी भक्त हे 'भक्त' नव्हेत, ते आहेत 'चमचे'

मंदिर नको, शाळा बांधा !
शेहला म्हणाली, " मुसलमानांवर अतिरेकी म्हणून शिक्के मारताना जरा हिंदूंनी केलेल्या अतिरेकबद्दल सुद्धा बोलले पाहिजे. आज मंदिर कुठे बनेल, यापेक्षाही रुग्णालय कुठे बनेल, शाळा कुठे बनेल, महिला सुरक्षित राहतील अशी जागा कुठे बनेल, हे प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे !"

घरवापसी ठीक, गाववापसी कधी ?
मेवानी म्हणाले, " घरवापसीच्या आधी गावकुसाबाहेर असणाऱ्या दलितांची आधी 'गाववापसी' करा ! मोदी सरकारच्या काळात सेक्युलर आणि सोशालिस्ट ऐवजी 'हिंदुवादी' आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातातील संविधान लागू करण्याचे प्रयत्न दिसतात. यात बदल होण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारावे लागणार आहे. 'गाय की पूंछ आप रखो, हमे ब्राह्मणवाद से मुक्ती दो' हाच उद्याचा नारा असणार आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com