कर्णे गुरुजींच्या पक्षांतरामुळे उत्सुकता 

कर्णे गुरुजींच्या पक्षांतरामुळे उत्सुकता 

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मतदार असलेल्या या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी यांना भाजपने उमेदवारी दिल्याने या भागातील चित्र बदलणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या भीमराव खरात या माजी नगरसेवकानेही आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर एका विद्यमान नगरसेविकेचे पती या वेळी रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे येथील लढत रंगतदार ठरणार आहे. 

पूर्वीच्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक १, ३ आणि १७ या प्रभागांचा भाग एकत्र करून विमाननगर - सोमनाथनगर हा प्रभाग तयार केला आहे. रामवाडी सिद्धार्थ, रमाई माता, बर्माशेल, यमुनानगर, गांधीनगर, जयप्रकाशनगर आदी नऊ झोपडपट्ट्या, विक्रीकर भवन, केंद्रीय विद्यालय, विमाननगर आदी उच्चभ्रू आणि सोसायट्यांचा, खेसे वस्ती, खांदवे वस्ती असा भाग यात आहे. जुन्या प्रभागात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्राबल्य होते. भाजपने कर्णे गुरुजींना सर्व साधारण गटातून (ड) उमेदवारी देऊन भगदाड पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तो किती यशस्वी होणार, हे मतदारच ठरवतील. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली असली, तरी या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. त्यामुळे मत विभाजनाचा फायदा कोण उठविणार, हादेखील चर्चेचा विषय झाला आहे. 

अनुसूचित जाती (अ) या गटातून विद्यमान नगरसेविका मीनल सरवदे यांचे पती आनंद सरवदे रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचे खरात, काँग्रेसचे रमेश सकट, भाजपचे राहुल भंडारे, मनसेचे नीलेश गायकवाड यांचे आव्हान आहे. मागासवर्ग महिला गटातून (ब) राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका उषा कळमकर यांना पुन्हा संधी मिळाली आहे. काँग्रेसच्या कविता शिरसाट, भाजपच्या श्‍वेता खोसे, शिवसेनेच्या संध्या खेडेकर यांच्याशी त्यांची लढत आहे. सर्वसाधारण महिला (क) गटातून बहुतेक पक्षांनी नवोदित उमेदवार दिले आहेत. शिवसेनेच्या माजी नगरसेविका मंदाकिनी खुळे या वेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. राष्ट्रवादीकडून सुरेखा खांदवे, शिवसेनेकडून वैशाली चांदेरे, काँग्रेसकडून सागरताई रोडगे, भाजपकडून मुक्ताबाई जगताप, भारिपकडून रेखा बनसोडे या रिंगणात आहेत. 

सर्वसाधारण गटातून (ड) सर्वांत जास्त उमेदवार रिंगणात आले आहे. यामध्ये कर्णे गुरुजींसमोर शिवसेनेचे प्रीतम खांदवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश आढाव, काँग्रेसचे लव्हे भुजंग, मनसेचे मोहनराव शिंदे, बसपाचे राहुल बोडरे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे शंकर शेळके यांचे आव्हान असेल. एकूण याच प्रभागात राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासमोर इतर पक्ष किती मोठे आव्हान उभे करणार, प्रचारातील रणनीती काय असेल, यावरच निकाल अवलंबून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com