कासारसाई धरणातून विसर्ग सुरूच

कासारसाई - धरणाची पाणीपातळी वाढल्याने धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग.
कासारसाई - धरणाची पाणीपातळी वाढल्याने धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग.

सोमाटणे - पवन मावळात पडत असलेल्या संततधार पावसाने पवना, आढले व कासारसाई नदीला पूर आला असून तीनही नद्या धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहेत. 

गेल्या तीन दिवसांपासून पवनमावळात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभरात कासारसाई धरण परिसरात चोवीस तासांत ११३ मिलिमीटर, तर एकूण ५३० मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे डोंगरदऱ्यातून वाहत असलेल्या जोराच्या पाण्यामुळे कासारसाई धरणाची पाणीपातळी वेगाने वाढली. धरणात उपयुक्त पाणीसाठा १४.९४ दशलक्ष घनमीटर, तर एकूण पाणीसाठा १६.२६ दशलक्ष घनमीटर झाला असून, धरण ९३ टक्के भरले आहे.

पाणीपातळी वाढल्याने पाणी नियंत्रित करण्यासाठी धरणातून १३७७ क्‍युसेकप्रमाणे पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली आहे. यामुळे ही नदी सांगवडे गावाजवळ धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहे. संततधार पावसामुळे पवना नदीलाही मोठा पूर आला असून, या पुरामुळे साळुंब्रे साकव, गोडुंब्रे जुना पूल पाण्याखाली गेले. धामणे, बेबडओहोळ, थुगाव, कडधे, शिवली, पुलाजवळ नदी धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहे. आढले धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडल्याने चांदखेड, दारुंब्रे पुलाजवळ आढले नदी धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहे. 

आंद्रा धरण ८५ टक्के भरले
टाकवे बुद्रुक : आंद्रा धरण परिसरात मंगळवार (ता. १७) अखेर ५१४ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून, धरण ८४.२३ टक्के भरले आहे. मंगळवारी दुपारपर्यंत ५५मिलिमीटर पाऊस पडला. 

जलाशयाची पातळी ६१२.१५ मीटर आहे. पाण्याचा एकूण साठा ७०.२६ दशलक्ष घनमीटर असून, त्यापैकी ६९.७० दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा साठा आहे. तीन टीएमसी पाणी साठवणूक क्षमता असलेले हे धरण आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या दोन दिवसांत धरण १०० टक्के भरण्याची शक्‍यता आहे.

धरण परिसरात पाऊस ओसरला
पवनानगर - पवना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर ओसरला असून, मंगळवारी (ता. १७) केवळ ६१ मिलिमाटर पावसाची नोंद झाली. सोमवारी धरण परिसरामध्ये २२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती; परंतु मंगळवार सकाळपासून पावसाची उघडझाप सुरू होती. धरणामध्ये सध्या ७८ टक्के पाणीसाठा झाला आहे.

आंदर मावळात इंद्रायणीच्या पात्रात वाढ
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंदर मावळातील ओढे, नाले, नदीला पूर आला आहे. इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून आंद्रा, ठोकळवाडी धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. इंद्रायणीतील पाणी वाढून पुलाला टेकले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com