कात्रज घाटातील प्रवास सुखद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

खेड-शिवापूर - काही महिन्यांपूर्वी खड्ड्यांमुळे कात्रज घाटातून वाहन चालविणे अवघड झाले होते. त्यामुळे येथून प्रवास करताना प्रवासी त्रस्त व्हायचे; परंतु नुकतेच घाट रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्याने घाटातून वाहन चालविणे सुखद बनले आहे. 

खेड-शिवापूर - काही महिन्यांपूर्वी खड्ड्यांमुळे कात्रज घाटातून वाहन चालविणे अवघड झाले होते. त्यामुळे येथून प्रवास करताना प्रवासी त्रस्त व्हायचे; परंतु नुकतेच घाट रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्याने घाटातून वाहन चालविणे सुखद बनले आहे. 

शिंदेवाडीपासून गुजरवाडीपर्यंत कात्रज घाट सुमारे सहा किलोमीटर अंतराचा आहे. त्यातील सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील डांबरीकरण झाले होते, तर सुमारे तीन किलोमीटरच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरक्षः चाळण झाली होती. घाटातील या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले होते. अनेकांनी घाटातील या खड्ड्यांमुळे पुण्याला जाण्या-येण्याचा मार्ग बदलला होता. सुमारे वर्षभर घाट रस्त्याची अशी दुरवस्था होती. 

‘सकाळ’ने घाट रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत डिसेंबर-२०१७ मध्ये घाट रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरवात करण्यात आली होती. सध्या घाटातील या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत. पूर्वी घाटातील खड्ड्यांमधून वाट काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. पण, सध्या डांबरीकरणामुळे घाटातून प्रवास करताना प्रवाशांना सुखद अनुभव येत आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचून खड्डे पडणार नाहीत, याची सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्षता घ्यावी, असे डॉ. संजय क्षीरसागर आणि दीपक शिंदे या रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.

कात्रज घाटातील सहा किलोमीटर रस्त्याचे काम तीन टप्प्यात पूर्ण करण्यात आले आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर येऊ नये, यासाठी घाटात गरजेच्या ठिकाणी काँक्रिटचे चर काढण्यात येणार आहेत. यापुढे कात्रज घाटात राडारोडा आणि कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 
- नकुल रणसिंग, कनिष्ठ अभियंता

Web Title: katraj ghat road journey