अनधिकृत बांधकाम रोखले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

कात्रज - कात्रज येथील राजस सोसायटीलगतच्या कमला सिटी, आदिनाथ विहार, महावीर सोसायटी परिसरातील ‘ॲमेनिटी स्पेस’च्या जागेत नागरिकांना विश्वासात न घेता अनधिकृतपणे महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून कोठी बांधली जात आहे. त्याला  नागरिकांसोबत नगरसेवक वसंत मोरे व प्रकाश कदम यांनी विरोध करून हे काम थांबवले. 

कात्रज - कात्रज येथील राजस सोसायटीलगतच्या कमला सिटी, आदिनाथ विहार, महावीर सोसायटी परिसरातील ‘ॲमेनिटी स्पेस’च्या जागेत नागरिकांना विश्वासात न घेता अनधिकृतपणे महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून कोठी बांधली जात आहे. त्याला  नागरिकांसोबत नगरसेवक वसंत मोरे व प्रकाश कदम यांनी विरोध करून हे काम थांबवले. 

कात्रज येथील राजस सोसायटीलगतच्या कमला सिटी सोसायटी व आदिनाथ विहारची दहा गुंठे ‘ॲमेनिटी स्पेस’ महापालिकेच्या ताब्यात आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी कात्रज तलावात होणारे गणेशमूर्ती विसर्जन टाळण्यासाठी आणि तलावाशेजारील विसर्जन हौदावर होणारी गर्दी विभागण्यासाठी कमला सिटी सोसायटीलगतच्या ‘ॲमेनिटी स्पेस’मध्ये विसर्जन हौद उभारण्यात आला होता. त्या ठिकाणी कात्रज- कोंढवा रस्ता परिसर, सुखसागरनगर, राजस, अरुणोदय, गोकूळनगर, शिवशंभोनगरसह अनेक सोसायट्यांतील गणेशभक्त गेली अनेक वर्षे तब्बल पाच हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करतात. दरम्यान, या दहा गुंठे जागेत अचानक स्थापत्य विभागाच्या कोठ्या उभारण्याचे काम सुरू झाले होते. याबाबत नागरिकांनी नगरसेवकांसह सहायक आयुक्तांना निवेदन दिले होते. मात्र काम न थांबता ते वेगाने होऊ लागले होते. अखेर मोरे व कदम यांच्यासोबत शेजारील सर्व सोसायट्यांतील नागरिक एकवटले आणि काम बंद करण्यास भाग पाडले. 
याबाबत सहायक आयुक्त नितीन उधास म्हणाले, की वरिष्ठांशी बोलूनच महापालिकेच्या जागेत महापालिकेच्याच कामासाठी बांधकाम होत आहे. ते पुढे सुरू ठेवणार आहे. 

मोरे म्हणाले, ‘‘नागरी हितासाठी ओटा मार्केटसाठी जागा आरक्षित असताना नियमबाह्य कोठ्या उभारल्या जात आहेत. आरक्षण कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. कात्रज- कोंढवा मार्गावर वीस गुंठ्यांच्या प्रशस्त दोन जागा कोठीसाठी सोईस्कर असताना रहिवाशी भागातील जागेवर कोठ्या उभारण्याचा आडमुठेपणा केला जात आहे. आयुक्तांची परवानगी न घेता कोणताच कार्यादेश नसताना अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. काम नाही थांबवले, तर प्रसंगी आंदोलन करणार आहोत. येणाऱ्या महापालिकेच्या मुख्य सभेत सहायक आयुक्तांच्या निलंबनाची मागणी करतानाच प्रसंगी महापालिकेच्या न्यायालयात दाद मागणार आहोत.’’

स्थानिक नगरसेवक म्हणून मी नागरिकांच्या हिताचा विचार करणार आहे. पर्यायी जागा आहेत, त्याही वसाहतीपासून काही अंतरावर आहेत. त्या ठिकाणीच कोठी बांधण्याचा आम्ही आग्रह धरणार आहोत. मात्र कोठीच्या सध्या सुरू असलेल्या बांधकामाला विरोध करणार आहोत.
- प्रकाश कदम, नगरसेवक