कात्रज बोगद्यानजीक सुरक्षा जाळ्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

कात्रज - प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कात्रज जुन्या बोगद्याच्या प्रवेशानजीक दरडींना तत्काळ सुरक्षा जाळ्या बसविण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी दिली. येथील दरड कोसळण्याच्या स्थितीत असून त्याचा प्रवाशांना धोका असल्याचे वृत्त नुकतेच ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत अधिकाऱ्यांनी तत्काळ पाहणी करून येथे ठोस उपाय योजना केल्या जातील, असे आश्‍वासन दिले.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने कात्रज येथील जुना बोगद्याच्या प्रवेशानजीक दगड माती कोसळली होती. टेकडीवरील झाडांची मुळे उघडी होऊन उताराचा भूभाग कमकुवत होऊन कोसळण्याच्या स्थितीत निदर्शनास आले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही उपाययोजना केलेली नव्हती. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि बोगदा परिसराची पाहणी केली.

देशपांडे म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने भूवैज्ञानिक तज्ज्ञांची नेमणूक करून कात्रजसह विविध घाटातील दरड प्रवण क्षेत्रांची माहिती मिळवली होती. यावर्षीही तज्ज्ञ पाहणी करत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कात्रज बोगदा परिसरातही आम्ही तत्काळ सुरक्षा जाळ्या बसवणार आहोत.’’

कडक कारवाईची गरज
वन विभागाच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाने डोंगरमाथ्याची पाहणी करावी. कात्रज घाटात डोंगर माथ्यावर होणारी बेकायदा खोदाई, टेकडी फोड, बेकायदा रस्ते करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. घाट माथ्यावर झालेल्या बेकायदा कामांमुळे नैसर्गिक जलस्रोताचे प्रवाह बदलले आहेत. परिणामी मोठ्या पावसात दगड कोसळण्याचे प्रकार वाढले आहे.