प्रतिलिटर ७० पैसे फरक मिळणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

कात्रज - दूध उत्पादकांना प्रतिलिटर सत्तर पैसे फरक देण्याचा निर्णय पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाने वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला. प्रतिलिटर पन्नास पैसे फरक देण्याचे संघाने जाहीर केले असता, मागील वर्षाप्रमाणेच एक रुपया फरक कायम ठेवण्याची मागणी सभासदांनी केली होती. या पार्श्‍वभूमीवर संघाने हा निर्णय घेतला. सुमारे ५० हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी फरकाची रक्कम वर्ग होणार आहे.

नोटाबंदी, सरकारचे जाचक दूधखरेदी व विक्री धोरण, खासगी दूध संघांची स्पर्धा, परराज्यांतील दूध कंपन्यांचा शिरकाव आदींच्या पार्श्वभूमीवर कात्रज डेअरी येथे संघाची ५८वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर, संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, उपाध्यक्षा वैशाली गोपाळघरे, संचालक रामचंद्र ठोंबरे, गोपाळ म्हस्के, लक्ष्मण तिटकारेंसह सर्व संचालक उपस्थित होते. 

सर्व उत्पादक संस्थांनी कॅशलेस व्यवहार करावा; अन्यथा संस्थेचा सचिव किंवा संचालक मंडळावर कारवाई करण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाला  विरोध करावा, असा ठराव दूध उत्पादकांनी मांडला. सरकारने दूध उत्पादकांना प्रतिलिटर ४ रुपये अनुदान द्यावे, हे दोन ठराव आयत्या वेळी मांडून ते संमत करण्यात आले. या निमित्ताने उल्लेखनीय काम करणाऱ्या १६ दूध संस्थांना सन्मानचिन्ह आणि १२ हजार रुपये किमतीचे विविध क्षमतेच्या स्टेनलेस स्टीलच्या किटल्या व कॅन देऊन गौरविण्यात आले.

Web Title: katraj pune news milk rate differance