रोख रकमांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवा 

saurabh-rao
saurabh-rao

पुणे - विधान परिषदेचे उमेदवार आणि विविध पक्षांकडून केल्या जाणाऱ्या रोख रकमांच्या व्यवहारावर प्राप्तिकर आणि विक्रीकर विभागांनी विशेष लक्ष ठेवावे, अशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केली. विधान परिषदेची निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी आचारसंहितेचे पालन होणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्यासह अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते. निवडणुकीत गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून अधिक पारदर्शकपणे काम करून निवडणूक यंत्रणेची प्रतिमा चांगली राहिली पाहिजे, याकडे सर्वच घटकांनी लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. ते म्हणाले, ""निवडणुकीदरम्यान नियमबाह्य होर्डिंग्ज, बॅनरद्वारे राजकीय स्वरूपाच्या जाहिराती लावल्या जाणार नाहीत याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. बॅंकांमार्फत होणाऱ्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराबाबत सतर्क राहावे. पैशाचा दुरुपयोग निवडणुकीत झाला नाही पाहिजे, त्यासाठी विविध बॅंकांमार्फत नोटांची माहिती रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनेनुसार घ्यावी. तसेच, त्याचा अहवालही नियमित कळवावा.'' 

निवडणूक कालावधीत सराफांकडून गैरव्यवहार होऊ नये अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. भरारी व दक्षता पथकांनी आवश्‍यक कार्यवाही करण्याच्याही सूचना दिल्या. 

या बैठकीस उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी समीक्षा चंद्राकार, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक दिवाकर देशमुख, जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड (शहर), देवेंद्र कटके (ग्रामीण), आयकर, विक्रीकर, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com