दुकानदारांच्या आडमुठेपणामुळे रॉकेल बंद

शिवाजी आतकरी
बुधवार, 22 मार्च 2017

निगडी - रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना स्वयंपाकाचा गॅस नसल्याचे प्रतिज्ञापत्र व कुटुंबाची माहिती देणे सरकारने अनिवार्य केले आहे. त्या अनुषंगाने स्वस्त धान्य दुकानांची तपासणीही केली जाणार आहे. मात्र, ही प्रक्रिया जाचक असल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य (रेशन) दुकानदारांनी रॉकेल न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिधापत्रिकेवर रॉकेल मिळणे बंद झाले असून, अनेक कुटुंबांचे हाल सुरू आहेत. 

निगडी - रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना स्वयंपाकाचा गॅस नसल्याचे प्रतिज्ञापत्र व कुटुंबाची माहिती देणे सरकारने अनिवार्य केले आहे. त्या अनुषंगाने स्वस्त धान्य दुकानांची तपासणीही केली जाणार आहे. मात्र, ही प्रक्रिया जाचक असल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य (रेशन) दुकानदारांनी रॉकेल न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिधापत्रिकेवर रॉकेल मिळणे बंद झाले असून, अनेक कुटुंबांचे हाल सुरू आहेत. 

गॅस असणाऱ्या कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून रॉकेल न देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यांच्या शिधापत्रिकांवर गॅस असल्याचा शिक्का मारण्यात आला. या निर्णयामुळे रॉकेलच्या मागणीत घट होणे अपेक्षित होते. मात्र परिस्थिती जैसे थे राहिली. रॉकेल पुरवठादार कंपन्यांनी ही बाब सरकारच्या लक्षात आणून दिली. चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या निष्कर्षानंतर सरकारने वीस फेब्रुवारीला आदेश काढला, की रॉकेलसाठी शिधापत्रिकाधारकाने प्रतिज्ञापत्र सादर करावे. त्यात गॅस नसल्याने रॉकेलसाठी पात्र असल्याचे घोषित करावे लागणार आहे. तसेच शिधापत्रिकेवरील कुटुंबप्रमुखाचे वय, व्यवसाय, आधार क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची नावे, मोबाईल क्रमांक असे विवरण प्रतिज्ञापत्रात नमूद करावे लागणार आहे. या प्रक्रियेनंतरच पात्र शिधापत्रिकाधारकास रॉकेल दिले जाणार आहे. दरम्यान, खोटे प्रतिज्ञापत्र आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येऊन संबंधितांचा पुरवठा बंद करण्यात येणार आहे. जीवनावश्‍यक वस्तू अन्नधान्य अधिनियमानानुसार ही कारवाई अन्नधान्य पुरवठा विभाग करणार असल्याचा सरकारचा आदेश आहे.

याशिवाय कोणत्याही दुकानाची तपासणी केव्हाही केली जाणार आहे.
दरम्यान, प्रतिज्ञापत्र व तपासणी जाचक असल्याची भावना स्वस्त धान्य दुकानदारांची आहे. त्यामुळे रॉकेल उचलायचे नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. परिणामी पिंपरी आणि चिंचवड परिसरातील १९८ दुकानांतून वितरित होणारे रॉकेल बंद झाले आहे. यामुळे गॅसधारक नसलेल्या नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. खुल्या बाजारातून साधारणतः सत्तर रुपये लिटर भावाने रॉकेल खरेदी करावे लागत आहे. रेशन दुकानांमधील हा भाव सोळा रुपयांच्या आसपास आहे.

सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी
रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने पात्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांची माहिती, प्रतिज्ञापत्र अनिवार्य केले आहे. त्या अनुषंगाने तपासणीही केली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, दुकानदार जानेवारीपासून रॉकेलची मागणी नोंदवत नाहीत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रॉकेल घ्या, असा पत्रव्यवहार करून दुकानदारांना सूचना दिल्या आहेत. मात्र, रॉकेल उचलले जात नाही. परिणामी पिंपरी व चिंचवड विभागात रेशनवर रॉकेल मिळत नाही, असे पुरवठा विभागाचे प्रभारी परिमंडळ अधिकारी के. एस. भोंडवे यांनी सांगितले.

सरकारी आदेश काय?
स्वयंपाकाचा गॅस नसलेल्यांनाच रॉकेल मिळणार
रॉकेलसाठी पात्र असणाऱ्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार 
खोटे प्रमाणपत्र दिल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार 
अन्नधान्य पुरवठा बंद होणार 
दुकानांची केव्हाही तपासणी होणार

पिंपरी-चिंचवडमधील सद्य:स्थिती
रेशन दुकानदारांकडून रॉकेल उचलले जात नाही
शहरातील १९८ दुकानांतून रॉकेल गायब
गरजू नागरिक व त्यांच्या कुटुंबांचे हाल
पुरवठा विभागाच्या सूचनेला दुकानदारांकडून केराची टोपली
खुल्या बाजारातून महागडे रॉकेल खरेदीची वेळ

Web Title: kerosene close by shopkeeper