पाण्याखाली अडीच तास योगासने!

सागर शिंगटे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पिंपरी - तुम्हाला योगासनाचे प्रकार माहिती असतील. तुम्ही दररोज अवघड आसनेही करीत असाल; परंतु तुम्ही कधी पाण्याखाली योगासने केली आहेत?... तर मग थोडी प्रतीक्षा करा.. पुण्यातील विक्रमवीर युवा स्कूबा डायव्हर खुशी परमार जागतिक योगदिनी (२१ जून) पाण्याखाली तब्बल अडीच तास विविध प्रकारची योगासने करणार आहे. खुशीने आत्तापर्यंत अनेक विक्रमांची नोंद केली आहे. त्यामध्ये आणखी एका विक्रमाची भर पडणार आहे. 

प्राधिकरणात पुस्तक प्रकाशनानिमित्त खुशी आली होती. त्या वेळी ‘सकाळ’शी बोलताना तिने ही माहिती दिली. या वेळी खुशीचे वडील अजित आणि आई पौर्णिमा उपस्थित होते. खुशी म्हणाली, ‘‘मालवण येथे दीर्घपल्ल्याच्या जलतरण स्पर्धेच्या वेळेस वयाच्या १२व्या वर्षी मला सर्वप्रथम स्कुबा डायव्हिंगची ओळख झाली. गोव्यातील समुद्रात स्कुबा डाइव्हिंगचा मी पहिला अनुभव घेतला. तेव्हापासून आत्तापर्यंत मी मालदीव, मलेशिया, इंडोनेशिया येथे एकूण मिळून १०१ वेळा स्कूबा डाइव्हिंग केले आहे. मालदीवमध्ये सर्वांत जास्त म्हणजे ३५ मीटर खोलीवर ४५ मिनिटे स्कुबा डायव्हिंग केले आहे.’’ 

खुशीने आत्तापर्यंत सलग ६ तास ३२ मिनिटे पोहणे, मोटारसायकलवरून ३ सेकंदात ५७३ ट्युबलाईटस्‌ फोडणे, सर्वांत लहान स्कुबा डाइव्हर, सर्वाधिक काळ पाण्याखाली राहून चित्रकला आणि नृत्यकला (२ तास) यासारखे एकूण आठ विक्रम नोंदविले आहेत. आता तिला स्वतःचाच पाण्याखाली सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम मोडायचा आहे. त्यासाठी पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील तलावामध्ये येत्या २१ जूनला ती पाण्याखाली अडीच तास योगासने करणार आहे.

मुलांपेक्षा मुली कोठेही कमी नाहीत, हे दाखवून देण्यासाठी खुशीला आम्ही प्रोत्साहन देत आहोत. तिची इच्छा असेपर्यंत ते देत राहू. नौदलाची परीक्षा देण्याचा खुशीचा विचार आहे.
 - अजित परमार, खुशीचे वडील.

Web Title: khushi parmar scuba diving yogasan motivation