"शाळा आपल्या दारी'ला प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

पुणे - कॅंटोन्मेंटमधील विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास व्हावा आणि शाळांनीही दर्जात्मक शिक्षण द्यावे, यासाठी खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून "शाळा आपल्या दारी' हा उपक्रम राबविण्यास सुरवात झाली आहे. प्रशासनाकडून पालक- शिक्षक सुसंवाद घडवून आणण्यास प्राधान्य दिले आहे. आठ रविवारी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, कष्टकरी पालकांनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर धीरज मोहन व मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. नुकतेच याचे उद्‌घाटन करण्यात आले. या प्रसंगी बोर्डाचे उपाध्यक्ष सुरेश कांबळे, शाळा समितीचे अध्यक्ष अभय सावंत, कमलेश चासकर, मनीष आनंद, पूजा आनंद, कार्तिकी हिवरकर, वैशाली पहिलवान व दुर्योधन भापकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. 

या वेळी विद्यार्थ्यांची सद्यःस्थिती, पालकांनी नेमके काय करावे, पाल्यांना कसा वेळ द्यावा यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. 

या उपक्रमांतर्गत शिक्षण हक्क, मिळणाऱ्या सवलती व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यावर भर देण्यात येणार आहे. उर्वरित सात रविवारी कॅंटोन्मेंटच्या विविध भागांमधील आठ झोपडपट्ट्यांमध्ये कॅंटोन्मेंट प्रशासन जाणार आहे. 

जगताप म्हणाले, ""कॅंटोन्मेंटच्या शाळांमध्ये जाणारे 95 टक्के विद्यार्थी आर्थिक व सामाजिक मागास घटकातील आहेत. बहुतांश पालक रिक्षाचालक, ड्रायव्हर, मजूर, पथारी व्यावसायिक असून निरक्षरता, अल्पशिक्षण व कामाच्या ताणामुळे त्यांना आपल्या पाल्यांकडे लक्ष देता येत नाही. बहुतांश विद्यार्थी हुशार आहेत. त्यांच्याकडे पालकांनी काही प्रमाणात लक्ष दिल्यास त्यांचे आयुष्य बदलू शकते. म्हणूनच आम्ही "शाळा आपल्या दारी' हा उपक्रम राबविला आहे. यात कॅंटोन्मेंट प्रशासन व शिक्षक पालकांना त्यांच्या मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मदत करणार आहेत.'' 

कॅंटोन्मेंटच्या आठवी ते दहावीपर्यंतचे काही विद्यार्थी काम करून शिक्षण घेत आहेत. वाईट संगतीमुळे अभ्यास व आयुष्यावर परिणाम होऊ नये, यासाठी त्यांच्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. याच उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. 
- अमोल जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड